मूर्च्छित बिबट्या अचानक उठतो तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2022 01:39 AM2022-03-05T01:39:00+5:302022-03-05T01:39:30+5:30

वाडीपिसोळ शिवारात शेतात मूर्च्छित होऊन पडलेल्या बिबट्याने अचानक उठून तरुणावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि.४) घडली आहे. तरुणाने प्रसंगावधान राखत बिबट्यास धक्का देऊन पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, जीव वाचविण्याच्या प्रयत्नात तरुण किरकोळ जखमी झाला आहे.

When an unconscious leopard suddenly wakes up ... | मूर्च्छित बिबट्या अचानक उठतो तेव्हा...

मूर्च्छित बिबट्या अचानक उठतो तेव्हा...

Next
ठळक मुद्देवाडीपिसोळ : शेतकरी किरकोळ जखमी, बिबट्या जेरबंद

जायखेडा : येथील वाडीपिसोळ शिवारात शेतात मूर्च्छित होऊन पडलेल्या बिबट्याने अचानक उठून तरुणावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि.४) घडली आहे. तरुणाने प्रसंगावधान राखत बिबट्यास धक्का देऊन पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, जीव वाचविण्याच्या प्रयत्नात तरुण किरकोळ जखमी झाला आहे. वन विभागाने या घटनेची तातडीने गंभीर दखल घेत अवघ्या दहा ते बारा तासांत बिबट्यास जेरबंद केले. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. जायखेडा येथील वाडीपिसोळ शिवारातील शेतात भावडू सोनवणे हा शेतकरी सायंकाळी कांद्यास पाणी भरत असताना कांदा पिकात बिबट्या निपचित पडलेला आढळून आला. या शेतकऱ्याने तात्काळ येथील पोलीस पाटील डॉ. योगेश खैरनार यांना याबाबत भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. पोलीस पाटील खैरनार यांनी वन विभागास याबाबत माहिती देऊन खाजगी पशुसेवा करणारे डॉ. कपिल अहिरे, अशोक जगतात, मुन्ना जाधव व माजी सरपंच काकाजी सूर्यवंशी आदींसोबत घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, शेतात बिबट्या बेशुद्ध अवस्थेत पडलेला असल्याची वार्ता परिसरात पसरल्याने बिबट्यास बघण्यासाठी गर्दी जमा होऊ लागली. जमलेल्या गर्दीस हटविण्याच्या प्रयत्नात ही मंडळी असतानाच बिबट्याने अचानक उठून उपस्थितांच्या दिशेने धाव घेतली. अनपेक्षित घडलेल्या या प्रकारामुळे एकच धावपळ उडाली. या धावपळीत कपिल अहिरे या तरुणावर बिबट्याने झडप घालण्याच्या प्रयत्न केला. यावेळी तरुण बिबट्यास धक्का देत जीव घेऊन पळाल्याने व सुदैवाने जमलेल्या नागरिकांनी आरडाओरड केल्याने तरुणाचा जीव वाचला. दरम्यान, बिबट्या शेजारच्या शेतांमध्ये पळून जाण्यास यशस्वी झाला.

इन्फो

थकलेल्या अवस्थेत आढळला बिबट्या

वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना रात्री घराबाहेर न पडण्याचे आवाहन करीत पहाटेच वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक ए.आर. शिंदे, अरुण सय्यद, आकाश कोळी, वनरक्षक भदाने, माणिक मोरे, सुरेश चौरे, गौरव अहिरे, महिला वनरक्षक वर्षा सोनवणे, बहिरम, चौरे व वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याची शोधमोहीम राबविली. यावेळी जवळच असलेल्या कांद्याच्या शेतात हा बिबट्या थकलेल्या अवस्थेत आढळून आला. सदर बिबट्या कमी वयाचा असल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जाळी टाकून त्यास पकडले. त्याच्यावर वन विभागामार्फत औषधोपचार करण्यात येत असून, त्याची तब्बेत ठीक असल्याचे वन विभागाने सांगितले.

Web Title: When an unconscious leopard suddenly wakes up ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.