...जेव्हा नाशिकच्या रुग्णाचा मृतदेह भोपाळच्या दिशेने रवाना होतो
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 05:53 PM2020-08-30T17:53:19+5:302020-08-30T17:53:35+5:30
जिल्हा शासकीय रुग्णालय : नातेवाईकांनी ओळख पटवून ताबा घेतला
नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शवविच्छेदन कक्षातून उत्तरीय तपासणी होऊन संबंधित नातेवाईकांद्वारे ओळख पटवून प्रशासनाकडून दोन्ही मृतदेह त्यांच्या कुटूंबियांना सोपविण्यात आले खरे; मात्र नाशिकचा मृतदेह थेट भोपाळच्या दिशेने आणि भोपाळवासीय मृत व्यक्तीचा मृतदेह नाशिककर कुटुंबीयांकडे आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांची चूक असल्याचे सांगितले आहे.
गेल्या शनिवारी संध्याकाळच्या सुमारास दोन मृतदेहांचा शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर त्यांचे कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले मात्र यावेळी दोन्ही कुटुंबीयांची गफलत झाल्याने मृतदेह ताब्यात घेताना व रुग्णवाहिकेत ठेवतांना आदलाबदल झाल्यामुळे नाशिककर मयत व्यक्तीचा मृतदेह भोपळ्यात रुग्णवाहिकेत आणि भोपाळस्थित मयत व्यक्तीचा मृतदेह नाशिकच्या कुटुंबीयांकडे आला. दरम्यान, हा सगळा प्रकार नाशिककर कुटुंबीयांकडून मृतदेहाच्या अंत्यसंस्कारला घेऊन जात असताना निदर्शनास आला. त्यामुळे तात्काळ नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती दिली.
टोल नाक्यावर मृतदेहांचा मध्यरात्री ताबा
नाशिककर कुटुंबातील सदस्यांनी भोपाळच्या दिशेने निघालेल्या रुग्णवाहिकेच्या नातेवाईकांचा संपर्क क्रमांक मिळवून तात्काळ त्यांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. यामुळे त्वरित चांदवड जवळील टोल नाक्यावर भोपालकडे जाणारी रुग्णवाहिका थांबविण्यात आली. त्यानंतर नाशिक कुटुंबीयांनी त्यांच्याजवळ असलेला भोपाळस्थित व्यक्तीचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिकेने चांदवड घातले आणि मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास या दोन्ही कुटुंबांनी एकमेकांच्या मयत नातेवाईकांची पुन्हा खात्रीपूर्वक ओळख पटवून मृतदेह ताब्यात घेतले.मृतदेह आदलाबदलचा सगळा प्रकार नेमका जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाला की नातेवाईकांचे चुकीमुळे याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
मृतदेह आदलाबदलचा हा सगळा प्रकार नातेवाईकांच्या चुकीमुळे घडल्याचे स्पष्ट आहे. कारण दोन्ही कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेताना नातेवाईकांनी ओळख पटविली होती त्यामुळे रुग्णालय प्रशासनाकडून काही हलगर्जीपणा झालेला नाही. संबंधित नातेवाईकांची नोंद स्वाक्षरीसह रुग्णालयाच्या दप्तरी आहे.
मृतदेह चुकीच्या पद्धतीने वेगवेगळ्या रुग्णवाहिकामध्ये ठेवण्यात आल्याने हा सगळा गोंधळ झाला. रुग्णवाहिकेतून मृतदेह ठेवण्यापर्यंतची जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची नाही.
- डॉ.निखिल सैंदाणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक
-