भाजपा नेत्यांनी युतीचा य कधी काढला?
By admin | Published: January 17, 2017 11:52 PM2017-01-17T23:52:20+5:302017-01-17T23:52:40+5:30
शिवसेना : युतीच्या कुबड्यांची गरज नसल्याची अजय बोरस्ते यांची टीका
नाशिक : गेल्यावेळी महापालिका निवडणुकीत भाजपानेच शिवसेनेशी युती तोडण्याचे पाप केले होते, आताही तेच करीत आहे. एका लाटेवर निवडून येणाऱ्या भाजपाच्या अहंकारामुळेच स्वबळाची भाषा बोलली जात असल्याची टीका शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी केली आहे. आपण फोन उचलत नसल्याचा भाजपाच्या नेत्यांचा आरोप खोडून काढताना भाजपाचे नेते पदवीधर निवडणुकीसाठी पाठिंबा मागण्यासाठी संपर्क साधतात, मात्र महापालिका निवडणुकीत युतीचा ‘य’ कधी त्यांनी उच्चारला नाही, असे सांगून पक्षाची खरी ताकद किती याचे आत्मपरीक्षण करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपाने स्वबळावर लढण्याची घोषणा केली. आमदार बाळासाहेब सानप यांनी इच्छुकांच्या निवडणुकीच्या प्रारंभीच ही घोषणा करताना भाजपाचे स्थानिक नेते प्रतिसाद देत नसल्याचा दावा केला होता. यासंदर्भात अजय बोरस्ते यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी भाजपावर टीका केली. गेल्यावेळी युती तोडून भाजपानेच जनतेचा विश्वासघात केला होता, आताही ते तोच प्रकार करीत आहेत. नुकत्याच नगरपालिका निवडणुका झाल्या. त्यात जिल्ह्यातील सहा नगरपालिकांपैकी चार जागा शिवसेनेने स्वबळावर जिंकल्या. एका नगरपालिकेतच कमळ फुलले, परंतु त्याला शिवसेनेचा टेकू होता असे सांगून ते म्हणाले की, लाटेवर निवडून आलेल्या भाजपाच्या आमदारांना आता आपले बळ वाढल्याचे वाटत आहे, परंतु आता त्यांनी आपले खरे बळ किती याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. असे बोरस्ते म्हणाले.