वडील किंवा आई गमावलेल्या ३८२ बालकांसाठीचा निधी केव्हा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:14 AM2021-08-01T04:14:42+5:302021-08-01T04:14:42+5:30
नाशिक : जिल्ह्यातील दोन पालक गमावलेल्या २४ बालकांच्या नावावर ५ लाख रुपयांच्या सहाय्य मुदत ठेवींचा निधी काळजी व संरक्षण ...
नाशिक : जिल्ह्यातील दोन पालक गमावलेल्या २४ बालकांच्या नावावर ५ लाख रुपयांच्या सहाय्य मुदत ठेवींचा निधी काळजी व संरक्षण कृतीदलाच्या आढावा बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यातून त्या बालकांच्या भविष्यासाठी काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र, एक पालक गमावलेल्या जिल्ह्यातील अधिकृत नोंद असलेल्या ७७८ बालकांपैकी केवळ ३९६ बालकांना बालसंगोपन निधीचा लाभ मंजूर झाला आहे. मात्र, अद्यापही ३८२ नोंद झालेल्या तसेच नोंद न झालेल्या शेकडो बालकांच्या दुसऱ्या जीवित पालकांना बालसंगोपन निधीचा प्रती बालकासाठीचा ११०० रुपयांचा दिलासा मिळण्याची अद्यापही प्रतीक्षाच आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे एक किंवा दोन्ही पालक गमावल्याने जी बालके अनाथ झाली आहेत, अशा बालकांच्या पुनर्वसन व सर्वांगिण विकासासाठी संबंधित बालक व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या नावे सामायिक बँक खात्यावर एकरकमी पाच लाख रुपये मुदत ठेवीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. मात्र, एक आणि विशेषत्वे कमावता पालक गमावलेल्या बालकांच्या दुसऱ्या पालकांची स्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. त्यांच्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या बालसंगोपन योजनांचा लाभ या बालकांना होण्यासाठी तातडीने नियोजन करण्याची आवश्यकता आहे.
इन्फो
तातडीने निधी मिळण्याची गरज
जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे पालक गमावलेली एकूण ८६१ बालके असून त्यापैकी शून्य ते १८ वयोगटातील २४ बालकांनी दोन्ही पालक गमावले असून त्यांच्यासाठीच्या मुदत ठेवीचा निधी मंजूर झाला आहे. १८ पर्यंतच्या वयोगटातील ७७८ बालकांनी एक पालक गमावला आहे. त्याचप्रमाणे तर १८ वर्षांवरील वयोगटातील ५० युवांनीही त्यांचे एक पालक गमावले आहेत. त्यातील ३९६ बालकांना बाल संगोपन योजनांचा लाभ मंजूर करण्यात आला असून वारस नोंदणी व शिधापत्रिकांच्या लाभासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. मात्र, उर्वरित नोंदणी झालेल्या ३८२ एकल पालकांसह अद्यापही नोंदणी न झालेल्या शेकडो एकल पालकांची तातडीने नोंदणी होऊन त्यांना तातडीने निर्धारित मदतीची रक्कम मिळण्याची गरज आहे.
इन्फो
एक पालक गमावलेल्या बालकांबाबत आवाहन
दोन्ही पालक तसेच एक पालक गमावलेल्या सर्व बालकांचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे. मात्र, प्रशासनाच्या अनेक मर्यादा असतात. त्यामुळे जागरुक नागरिकांनी त्यांच्या आसपासच्या गरजू कुटुंबातील एक पालक गमावलेल्या बालकाबाबत काही माहिती असल्यास त्या कुटुंबातील दुसऱ्या पालकाने तातडीने नासर्डी पूलानजीकच्या जिल्हा समाज कल्याण विभागाच्या जिल्हा आणि महिला बाल विकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुरेखा पाटील यांनी केले आहे.