तोतया ‘आयपीएस’ अधिकारी पोलीस आयुक्तालयात येतो तेव्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 07:46 PM2020-01-04T19:46:29+5:302020-01-04T19:49:17+5:30
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भारतीय दंड विधान ३५३ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी
नाशिक : ‘तुम्ही काय ड्यूटी करता, तुम्हाला नोकरी करता येते का...,’ असा जाब विचारत एका तोतया आयपीएस अधिकाऱ्याने पोलीस आयुक्तालयात गुरूवारी (दि.२) रात्री अकरा वाजेच्या सुमारास चांगलाच धिंगाणा घातला. नियंत्रण कक्षातील निरिक्षक, उपनिरिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी या महाशयाकडे ओळखपत्र मागितले असता, आधारकार्ड दाखवू बोळवण करत ‘मी तुम्हाला काहीही सांगणार नाही, माहिती देणार नाही, तम्ही मला सॅल्यूट का केला नाही...’ असा उलटप्रश्नही केला. या ‘आयपीएस नाट्या’ची आयुक्तालयात खमंग चर्चा रंगली.
पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य इमारतीमध्ये प्रवेश करत संशयित आरोपी तोतया आयपीएस अधिकारी राजेश बन्सीलाल वाघ (३१, रा.आश्विननगर, सिडको) याने मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षक म्हणून कर्तव्यावर असलेले भरत खंडेराव आहिरे यांना ‘मला सीपी साहेबांना भेटून गोपनीय माहिती द्यावयाची आहे, मी आयपीएस आहे...’ असा संवाद साधला. यानंतर आहिरे यांनी वाघ यास नियंत्रण कक्षात घेऊन गेले. यावेळी या महाशयाचा पारा अधिकच चढला आणि नियंत्रण कक्षात पाय ठेवताच त्याने आरडाओरड करत गोंधळ घालण्यास सुरूवात केली. यावेळी नियंत्रण कक्ष अधिकारी सहायक निरिक्षक अन्य कर्मचारीदेखील येथे जमले. यावेळी अधिका-यांनी या आयपीएसकडे ओळखपत्राची मागणी करत नाव, गाव, पत्ता याबाबत माहितीची विचारणा केली. यानंतर वाघ याने याबाबत उलटसुलट उत्तरे देत पोलिस अधिकारी व कर्मचाºयांच्या कर्तव्यावरच शंका घेत ‘तुम्हाला नोकरी करता येते का? असा प्रश्नही विचारला. यानंतर मात्र कर्तव्यावर असलेल्या खºया पोलिसांचा पाराही चढला, त्यांनी या महाशयाला चढलेली आयपीएसची झिंग ‘खाकी’च्या शैलीत उतरविली. तत्काळ सरकारवाडा पोलीस ठाण्याला माहिती देत पीटर मोबाईल वाहन बोलावून घेत त्याला सरकारी गाडीतून पोलीस ठाण्यात पाठविले. त्याच्याविरूध्द आहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भारतीय दंड विधान ३५३ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.