न्यायालयासमोर न्यायाधीश जेव्हा वाहतुक नियमाचा भंग करतात तेव्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 04:36 PM2019-02-14T16:36:53+5:302019-02-14T16:40:53+5:30
अशोकस्तंभाकडून सीबीएस, त्र्यंबकानाक्याकडे जाणा-या वाहतुकीला बंदी आहे. असे असतानाही नाशिक जिल्हा न्यायालयाच्या न्यायधीश घोडके यांनी एकेरी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत, मेहेर सिग्नलकडून सीबीएसकडे विरूध्द दिशेने त्यांची होंडा सीटी कार (एमएच १५ एफएफ ६८७८) स्वत:चालवून नियामाचा भंग केला.
नाशिक : महापालिकेच्या वतीने स्मार्टसिटीअंतर्ग जिल्हा न्यायालयासमोरुन जाणारा शहराचा मुख्य रस्ता विकसीत केला जात आहे. त्यामुळे अशोकस्तंभापासून थेट त्र्यंबकनाक्यापर्यंत या रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून शहर वाहतूक नियंत्रण शाखेने एकेरी वाहतूक सुरू ठेवली आहे. या रस्त्यावरून जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश सुचिा घोडके यांनी गुरूवारी (दि.१४) विरूध्द दिशेने वाहन धाडले. कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी त्यांचे वाहन रोखले असता त्यांनी ‘तुम्ही मला ओळखत नाही का? तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मला भेटायला पाठवा’ असा उर्मट सल्ला देऊन दंडाची रक्कम न भरता तेथून निसटून जाणे पसंत केले. कायद्याचे उल्लंघन करणा-यांना शिक्षा सुनावत न्यायदान करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडणा-यांकडून जेव्हा कायद्याचा भंग केला जातो तेव्हा नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा रंगली तर नवल ते काय...
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मागील दोन महिन्यांपासून त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अशोकस्तंभाकडून सीबीएस, त्र्यंबकानाक्याकडे जाणा-या वाहतुकीला बंदी आहे. असे असतानाही नाशिक जिल्हा न्यायालयाच्या न्यायधीश घोडके यांनी एकेरी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत, मेहेर सिग्नलकडून सीबीएसकडे विरूध्द दिशेने त्यांची होंडा सीटी कार (एमएच १५ एफएफ ६८७८) स्वत: चालवून नियामाचा भंग तर केलाच मात्र कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचा-यांकडून कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न झाला तेव्हा त्यांनी उर्मटपणाने अपशब्दही वापरून टाकले हे विशेष! वाहतूक पोलीस कर्मचा-यांनी घोडके यांना एकेरी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आणून दिले असता त्यांनी त्यावेळी आपण न्यायधीश असल्याचे सांगत पोलिसांशी बोलताना अपशब्द वापरले. तसेच दंडाची रक्कम न भरताच न्यायालयात मोटार धाडली. यावेळी प्रवेशद्वारामध्ये जाताना त्यांनी ‘तुमच्या वरिष्ठ अधिकाºयांना मला भेटायला बोलवा’ असा उर्मट सल्लाही देऊन टाकला.
जिल्हा न्यायालयाचा परिसर हा अत्यंत गजबजलेला असल्यामुळे प्रवेशद्वारावरच हा प्रकार घडल्याने परिसरातील वकील, नागरिक यांची गर्दी झाली होती. तसेच एकेरी वाहतूकीलाही खोळंबा झाला. घोडके यांनी दंड तर भरला नाही; मात्र ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी स्थिती यावेळी वाहतूक पोलिसांची झाली.
दरम्यान, यासंदर्भात शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा केली असता, त्यांनी याबाबत स्पष्टपणे दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. त्यांचे वाहन विरुध्द दिशेने आल्याचे सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत वाहनक्रमांकावरून त्यांचा नाव,पत्ता माहिती करुन त्या पत्त्यावर नियमानुसार दंडाची नोटीस वाहतूक विभागाकडून धाडली गेल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.