काझी गढी कोसळते तेव्हा..
By admin | Published: June 17, 2017 12:48 AM2017-06-17T00:48:37+5:302017-06-17T00:48:49+5:30
काझी गढीवरील तीन घरे कोसळून नुकसान झाल्याची माहिती मिळाली अन् या यंत्रणा तत्काळ सायरनचा आवाज करीत काझीच्या गढीकडे रवाना झाल्या़
.लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : वेळ दुपारी चार वाजेची अग्निशमन दल, पोलीस अन् महापालिकेच्या पूर्व व पश्चिम विभागीय कार्यालयास काझी गढीवरील तीन घरे कोसळून नुकसान झाल्याची माहिती मिळाली अन् या यंत्रणा तत्काळ सायरनचा आवाज करीत काझीच्या गढीकडे रवाना झाल्या़
यापैकी पोलिसांचा फौजफाटा दोरखंडाच्या साहाय्याने गढीवर पोचला तर अग्निशमन व रुग्णवाहिकेतील कर्मचारी या घटनेतील जखमींना उचलून घेऊन जात आहेत़ प्रशासनातील विविध विभागांतील यंत्रणाच्या या लगबगीमुळे नागरिकही बुचकळ्यात पडले़ मात्र, नंतर आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास काय काळजी घ्यावी यासाठी हे मॉकड्रिल असल्याचे समोर आले व सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला़ प्रशासनातील अग्निशमन, रुग्ण वाहिका, पोलीस अशा सर्वच यंत्रणांची वाहने काझीगडीकडे वेगाने निघाल्याने नक्की काय झाले हेच समजत नव्हते़ तसेच या यंत्रणांनाही हे मॉकड्रिल असल्याचे सांगण्यात आलेले नव्हते़ मात्र, अशी परिस्थिती काय काळजी घ्यावी याचे प्रात्यक्षिक या यंत्रणांनी अगदी व्यवस्थितरीत्या पार पाडले़