भींतीच्या भगदाडमध्ये अडकलेला बिबट्या डरकाळ्या फोडतो तेव्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 05:38 PM2019-10-20T17:38:07+5:302019-10-20T17:41:51+5:30
रविवारी मध्यरात्री बिबट्या अचानकपणे एचएएलच्या दगडी संरक्षण भिंतीला असलेल्या भगदाडातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात अडकून पडला.
नाशिक : मौजे साकोरे मिग येथील एचएएल मीगच्या परिसरात असलेल्या संरक्षण भिंतीच्या भगदाडमधून जाण्याच्या प्रयत्नात रविवारी (दि.२०) मध्यरात्रीच्या सुमारास एक प्रौढ बिबट्या अडकला. भगदाडच्या समोरील बाजूने संरक्षक तारेचे कुंपण असल्यामुळे बिबट्याला बाहेर पडता येत नसल्याने तो सुटकेसाठी झटापट करत होता. घटनेची माहिती मिळताच वनविभाग पूर्वच्या चांदवड, नाशिक पश्चिमच्या रेस्क्यू पथकाने धाव घेत बिबट्याला भुल देत सुटका केली.
रविवारी मध्यरात्री बिबट्या अचानकपणे एचएएलच्या दगडी संरक्षण भिंतीला असलेल्या भगदाडातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात अडकून पडला. कारण भिंतीच्या दोन्ही बाजूंनी संरक्षक लोखंडी तारेचे कुंपण होते. त्यामुळे बिबट्याला भगदाडमधून बाहेर पडणे शक्य होत नव्हते. त्यामुळे बिबट्या गुरगुरत डरकाळ्या फोडू लागला. तारेमुळे बिबट्याच्या शरीरावर काही प्रमाणात जखमा झाल्या. दिवस उगविल्यानंतर बिबट्या काही स्थानिकांच्या नजरेस पडला. त्यानंतर तेथील नागरिकांनी तत्काळ ओझर पोलीस ठाण्यासह वनविभागाला माहिती कळविली. तत्काळ उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी चांदवड, नाशिक पश्चिम कार्यालयांमधील रेस्क्यू पथकांना सर्व अत्यावश्यक साधनांसह घटनास्थळी पोहचण्याचे आदेश दिले. अवघ्या तासाभरात पथके घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही पथकांचे प्रमुख वनक्षेत्रपाल संजय पवार आणि विवेक भदाणे यांनी परिस्थितीचा अंदाज घेत त्वरित वनपाल मधुकर गोसावी, नाना चौधरी, दीपक जगताप, सुनील महाले इको-एको फाउण्डेशनचे अभिजीत महाले यांच्यासह अन्य वन्यजीवप्रेमींना सुचना देत ‘रेस्क्यू आॅपरेशन’ सुरू केले. बिबट्या तार आणि वायरींच्या जाळ्यात पाठीमागून पूर्णपणे अडकलेला असल्याचे लक्षात आल्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेत बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देण्यात आले. त्यांनतर वनकर्मचाऱ्यांनी बिबट्याला पिंजºयात घेऊन एचएएलच्या हद्दीतच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तोरण पवार, डॉ. अल्केश चौधरी यांच्यामार्फत जखमांवर उपचार सुरू केले. सायंकाळी बिबट्या शुध्दीवर आला.