भर उन्हात बाजारपेठा जलमय होतात तेव्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:17 AM2021-03-01T04:17:47+5:302021-03-01T04:17:47+5:30
शहर व परिसरात ठिकठिकाणी स्मार्टसिटी कंपनीकडून विविध विकासकामे केली जात आहे. अण्णा भाऊ साठे पुतळ्यापासून तर कालिदास कलामंदिरापर्यंत खोदकाम ...
शहर व परिसरात ठिकठिकाणी स्मार्टसिटी कंपनीकडून विविध विकासकामे केली जात आहे. अण्णा भाऊ साठे पुतळ्यापासून तर कालिदास कलामंदिरापर्यंत खोदकाम मागील दोन महिन्यांपासून सुरू आहे. दुपारच्या सुमारास जेसीबीच्या साहाय्याने सुरू असलेल्या खोदकामात जलवाहिनीला भगदाड पडले अन् पाण्याचे कारंजे हवेत उडाले. क्षणार्धात मोठ्या प्रमाणात पाणी कालिदास कलामंदिर ते शिवसेना कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावरून वाहू लागले. पाण्याचा दाब इतका प्रचंड होता की शालिमार, शिवाजी रोड, गाडगे महाराज पुतळा, भद्रकाली, सरस्वती लेन, दहीपूल हा सर्व बाजारपेठांचा परिसर जलमय झाला होता. यामुळे विक्रेत्यांसह नागरिकांचे चांगलेच हाल झाले. येथील दुकानदारांचा काही मालही पाण्यात भिजल्याची तक्रार संबंधितांनी केली. रविवारची सुट्टी असल्यामुळे मनपा पाणीपुरवठा (यांत्रिकी) विभागासह अन्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्यासही विलंब झाला. सुमारे अर्धा तास पिण्याचा पाण्याचा मोठा अपव्यय होत राहिल्याने, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. अचानकपणे शहरातील मध्यवर्ती परिसर असलेल्या बाजारपेठांच्या भागात पाण्याचा लोंढा नेमका येतोय कोठून, असा प्रश्न मेनरोड, भद्रकाली, शिवाजी रोड या भागातील नागरिकांना पडला होता. मोठ्या प्रमाणात प्रचंड वेगाने पाण्याचा लोंढा या भागात वाहत होता. एकीकडे जुने नाशिकसारख्या गावठाण भागात दोन दिवसांपासून पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही, तर दुसरीकडे मात्र ‘स्मार्ट’ कारभाराच्या नावाखाली अशा पद्धतीने जलवाहिन्या फुटतात अन् लाखो लीटर पिण्याचे पाणी गटारीत जाते, यास मनपा प्रशासन अन् स्मार्टसिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये असमन्वय कारणीभूत असल्याचे नाशिककर म्हणाले.
---इन्फो--
सरस्वती नाला गोदाघाटावर ओसंडून वाहिला
जुने नाशिक भागातून गोदावरीला जाऊन मिळणारा भूमिगत सरस्वती नाला या जलवाहिनीच्या वाया जाणाऱ्या पाण्यामुळे खळाळला. रामसेतू पुलाखाली या नाल्याचे पाणी गोदापात्रात ओसंडून वाहू लागल्याने येथील भाजीविक्रेत्यांची धावपळ उडाली. कपुर्थळा मैदानावर भरणाऱ्या बाजारातील विक्रेत्यांना आपला माल उचलून घेत सुरक्षितरीत्या स्थलांतर केले. शहरात पाऊस झाला नाही. मात्र, अचानकपणे सरस्वती नाल्याला पूरसदृश्य स्थिती कशी निर्माण झाली, असा प्रश्न गोदाघाटावरील विक्रेत्यांनाही पडला होता. (फोटो-११७)
---कोट---
स्मार्टसिटीचे काम सुरू असून, या खोदकामात जेसीबीचा धक्का जलवाहिनीला लागल्यामुळे जलवाहिनी अचानकपणे फुटली. घटनेची माहिती मिळताच तत्काळ पाणीपुरवठा व यांत्रिकी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. जलवाहिनीतून वाहणारे पाणी थांबविण्याची कार्यवाही सुरू केली. या जलवाहिनीचा मुख्य व्हॉल्व बंद करण्यात आला. जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असले, तरी सोमवारी या जलवाहिनीवर अवलंबून असणाऱ्या काही लोकवस्तीमध्ये दैनंदिन पाणीपुरवठा बाधित होण्याची शक्यता आहे.
- संदीप नलावडे, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग
----
फोटो क्र : २८पीएचएफबी१०० : मेनरोडवरील नवापुरा भागातून वाहणारे पाणी.
१०३/१०५- शालिमारकडून शिवाजी रोडकडे झेपावणारे पाणी.
२८पीएचफबी १०९ : महाकवी कालिदास कलामंदिरासमोरून शालिमारकडे येणारा पाण्याचा लोंढा.
१०८ : जलमय झालेला शालिमार चौक
(छायाचित्रे : नीलेश तांबे)