मनपा आयुक्त निवासस्थानाचे जेव्हा नामकरण होते...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:44 AM2021-01-08T04:44:40+5:302021-01-08T04:44:40+5:30
नाशिक- सध्या नामांतराचा वाद गाजत आहे. तो राजकीय भाग असला तरी या धामधुमीत नाशिक महापालिकेने मात्र महासभेतील एका ठरावान्वये ...
नाशिक- सध्या नामांतराचा वाद गाजत आहे. तो राजकीय भाग असला तरी या धामधुमीत नाशिक महापालिकेने मात्र महासभेतील एका ठरावान्वये आयुक्तांच्या बंगल्याचेच नामकरण करण्यात आले आहेत. महापौरांच्या निवासस्थानाचे रामायण असे नामकरण झाले; परंतु महापालिका आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानाला मात्र कोणतेही नाव नाही. त्यामुळे आता महासभेच्या ठरावान्वये आयुक्तांच्या बंगल्याचे रायगड असे नामकरण करण्यात आले आहे. प्रशासनाला नुकताच हा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. नाशिक महापालिकेची स्थापना झाल्यानंतर आयुक्तांचे निवासस्थान हे बांधले गेले. शासकीय विश्रामगृह आणि एलआयसी कार्यालयाच्या दरम्यान असलेला हा बंगला प्रशासन प्रमुखांचा असला तरी त्याला नाव देण्यात आलेले नव्हते. बंगल्याला नाव नसले तरी अनेक आयुक्तांच्या कारभारामुळे हा बंगला अनेकदा चर्चेत ठरला होता. एका आयुक्तांनी वास्तुशास्त्रानुसार इमारतीत बदल केले तर एकाने चक्क गायी वासरू येथे आणून बांधून ठेवले होते. अलिकडे एका आयुक्तांनी केलेले बदल खर्चामुळे चर्चेत ठरले हेाते. अर्थात, आयुक्तांच्या कारभारामुळे त्यांचे निवासस्थान चर्चेत असले तरी नवख्या माणसांना मात्र पत्ता सापडणे सोपे नव्हते.
त्यामुळे आयुक्तांच्या निवासस्थानाचा पत्ता विचारल्यानंतर मात्र थेट सांगता येत नव्हता. त्याउलट या भागातील विभागीय आयुक्तांच्या बंगल्याचे नाव राजगृह, जिल्हाधिकाऱ्यांचे सिंहगड तसेच अन्य शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांनादेखील नावे आहेत. याच मार्गावर शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासाठीदेखील नावे आहेत; मात्र आयुक्तांच्या बंगल्याला नाव नव्हते. हीच बाब लक्षात घेऊन सभागृह नेते सतीश सोनवणे आणि गटनेता जगदीश पाटील यांनी बंगल्याचे नामकरण रायगड असे केले आहे.
इन्फो...
महापालिकेच्या महासभेत अनेक नामकरणांचे ठराव हेातात. ७ डिसेंबर रोजी झालेल्या महासभा क्रमांक १० मधील ठराव क्रमांक ४३४ अन्यये हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता आयुक्तांचे निवासस्थान रायगड म्हणून परिचित होणार आहे.