‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच आयटीआयला सहसंचालकांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:36 AM2018-09-18T00:36:14+5:302018-09-18T00:36:41+5:30
सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सहा वर्षांपासून पूर्णवेळ प्राचार्य आणि दोन उपप्राचार्य नसल्याने शासनाने संस्था वाऱ्यावर सोडली की काय याबाबतचे वृत्त सोमवारच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक एस. आर. सूर्यवंशी यांनी आयटीआयला भेट देत सद्यस्थिती जाणून घेतली.
सातपूर : सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सहा वर्षांपासून पूर्णवेळ प्राचार्य आणि दोन उपप्राचार्य नसल्याने शासनाने संस्था वाऱ्यावर सोडली की काय याबाबतचे वृत्त सोमवारच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक एस. आर. सूर्यवंशी यांनी आयटीआयला भेट देत सद्यस्थिती जाणून घेतली. संस्थेला पूर्णवेळ प्राचार्य मिळावेत यासाठी मुख्यालयालाकडे लेखी अहवाल पाठविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. सातपूर येथे जिल्हास्तरीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) असून संस्थेत विविध प्रकारचे २७ व्यवसाय अभ्यासक्रमासाठी अडीच हजार प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. ५० च्या आसपास निदेशक असून शिक्षकेतर कर्मचारीही आहेत. या संस्थेसाठी एक प्राचार्य आणि दोन उपप्राचार्य यांची शासन नियमाप्रमाणे नियुक्ती आहे. जवळपास २०१२ पासून या संस्थेला पूर्णवेळ प्राचार्य उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. तर दोन उपप्राचार्यदेखील पूर्णवेळ दिलेले नाहीत. त्यामुळे संस्थेत वरिष्ठ अधिकारीच नसल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. संस्थेत एक प्राचार्य आणि दोन उपप्राचार्य पदांची नेमणूक असली तरी सद्यस्थितीत कळवण आयटीआयचे प्राचार्य सुभाष कदम यांचेकडे सातपूर आयटीआयचा प्रभारी प्राचार्यांचा पदभार सोपविण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या शासकीय संस्थेला पूर्णवेळ प्राचार्य आणि दोन उपप्राचार्य मिळू नयेत याबाबत सोमवारी ‘लोकमत’मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची तातडीने दखल घेऊन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक एस. आर. सूर्यवंशी यांनी आयटीआयला भेट देऊन दप्तर तपासणी केली. शिक्षकांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या आणि वर्गावर तसेच वर्कशॉपला भेट देऊन विद्यार्थ्यांच्याही अडचणी ऐकून घेतल्या.
मुख्यालयाला अहवाल पाठवू
संस्थेत आर. एफ. पाटील यांची प्राचार्य म्हणून पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु संचालकांनी पाटील यांना प्रतिनियुक्तीवर मुख्यालयात (मुंबईला) बोलावून घेतलेले आहे. प्राचार्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार मला नाहीत. परंतु पर्यायी व्यवस्था म्हणून कळवण आयटीआयचे प्राचार्य सुभाष कदम यांची प्रभारी म्हणून मी नेमणूक केली आहे. संस्थेला भेट देऊन स्टाफची माहिती घेतली आहे. लवकरच पूर्णवेळ प्राचार्यांची नियुक्ती करावी असा लेखी अहवाल आणि लोकमतमधील बातमी मुख्यालयाला पाठविणार आहे. - एस. आर. सूर्यवंशी, सहसंचालक