सप्तशृंगी गडावर दरड कोसळते तेव्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:15 AM2021-07-29T04:15:09+5:302021-07-29T04:15:09+5:30
सप्तशृंगी गडावर अधूनमधून दरड कोसळत असल्यामुळे सकाळी दरड कोसळून नागरिक जखमी झाल्याची माहिती कळवणच्या आपत्ती विभागाकडून सप्तशृंगी गड ...
सप्तशृंगी गडावर अधूनमधून दरड कोसळत असल्यामुळे सकाळी दरड कोसळून नागरिक जखमी झाल्याची माहिती कळवणच्या आपत्ती विभागाकडून सप्तशृंगी गड व नांदुरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात व प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळताच यंत्रणा घाटात घटनास्थळी दाखल होते. थोड्याच वेळात कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांचेसह तहसीलदार बी. ए. कापसे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या वाहनांचा ताफा सप्तशृंगी गडाकडे दाखल होतो. कळवण उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका सायरन वाजवत कळवण शहरातून वेगाने गेल्याने सप्तशृंगी गडावर दरड कोसळून नागरिक जखमी झाल्याची चर्चा पसरते. कळवण, अभोणा, वणी येथूनही यंत्रणा दाखल होते. विविध विभागाच्या वाहनांचा ताफा सप्तशृंगी गडाकडे रवाना झाला. वनविभाग , बांधकाम विभाग , पोलीस , आरोग्य विभाग , वीज वितरण आदी सर्व विभागाचे कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनाचे जवान घटनास्थळी हजर झाले . जेसीबी आदी आवश्यक साहित्य तातडीने बोलावले गेले. प्रशासनासोबत आजूबाजूच्या गावचे ग्रामस्थही मदतीला धावले . दरम्यानच्या काळात सप्तशृंगी गडावर घाटात दरड कोसळून नागरिक जखमी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरते. परिसरात मोठी घबराट निर्माण होते. सप्तशृंगी गड, नांदुरी गावातील नागरिकांचे भ्रमणध्वनी खणखणू लागतात. अखेर ही आपत्ती काळातील उपाययोजनांची रंगीत तालीम ( मॉक ड्रिल ) असल्याचे समजताच नागरिक सुटकेचा नि:श्वास सोडतात.
इन्फो
तळीयेच्या पार्श्वभूमीवर प्रात्यक्षिक
मुसळधार पावसामुळे सध्या ठिकठिकाणी भूस्खलन होऊन दरड कोसळण्याचे प्रमाण वाढले असून त्यात रायगड जिल्ह्यातील तळीये या गावी झालेली दुर्घटना या पार्श्वभूमीवर आपल्या परिसरात अशी दुर्घटना घडली तर, तातडीने मदत कार्य करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी जिल्हा प्रशासनाने ह्या रंगीत तालमीचे प्रात्यक्षिक ( मॉकड्रिल) केल्याचे सांगण्यात आले . दरम्यान स्थानिक रहिवासी अचानक गावात आलेला अधिकाऱ्यांचा ताफा पाहून काही काळ गोंधळून गेले होते .
फोटो- २८ वणी
सप्तशृंगी गडावर दरड कोसळल्याच्या माहितीनंतर सारी यंत्रणा घटनास्थळी हजर झाली होती.
280721\28nsk_31_28072021_13.jpg
फोटो- २८ वणी