घोरवड घाटात दरड कोसळते तेव्हा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:15 AM2021-07-31T04:15:10+5:302021-07-31T04:15:10+5:30
सिन्नर : अनेक ठिकाणी ढगफुटी व अतिवृष्टीने दरडी कोसळल्याच्या दुर्देवी घटना घडल्या. त्यात शंभराहून अधिक नागरिकांना प्राण ...
सिन्नर : अनेक ठिकाणी ढगफुटी व अतिवृष्टीने दरडी कोसळल्याच्या दुर्देवी घटना घडल्या. त्यात शंभराहून अधिक नागरिकांना प्राण गमवावे लागले. या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील यंत्रणेतील सज्जता तपासण्यासाठी सिन्नर-घोटी रस्त्यावर घोरवड घाटात सायंकाळी साडेपाच वाजता ‘लॅण्ड स्लाइड’आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक (मॉकड्रिल) घेण्यात आले. त्यात शोध व बचाव पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वसंरक्षणार्थ आवश्यक साहित्याची आवश्यकता असल्याची बाब समोर आली.
तहसीलदार राहुल कोताडे यांच्यासह नायब तहसीलदार दत्ता जाधव यांच्या पथकाने ही बाब नोंदवली. या प्रात्यक्षिकात सायंकाळी ५.३५च्या सुमारास घोरवड घाटाच्या पायथ्याला ‘लॅण्ड स्लाइड’ अर्थातच दरड कोसळल्याची घटना घडल्याची माहिती तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त झाली. ५.३५ ते ५.४५ या कालावधीत तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षातून घटनेची माहिती सर्व संबंधितांना देण्यात आली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षालाही अवगत करण्यात आले. सर्व अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी यांना व्हॉटसअॅप ग्रुपवर अवगत करण्यात आले. त्यानंतर संबंधित यंत्रणांचा प्रतिसाद कालावधी नोंदविण्यात आला.
या प्रात्यक्षिकावेळी तहसीलदार कोताडे व त्यांच्या पथकाने काही कमतरता नोंदवल्या आहेत. शोध व बचाव पथकांतील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी रेनकोट, गमबूट, हेल्मेट आदी साहित्य उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कारण ही पथके घटनास्थळी दाखल झाली. तेव्हा त्यांच्याकडे असे कुठलेही साहित्य नव्हते. आपत्ती व्यवस्थापन कक्षात नियुक्त कर्मचाऱ्यांना इतर संबंधित विभागांना घटनेची अचूक माहिती देण्याबाबत प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सिन्नर तालुक्याच्या भौगोलिक स्थितीनुसार पूर्व भाग, मध्य भाग व पश्चिम भाग या तीनही भागांमध्ये महामार्गाच्या ठेकेदारांचे कॅम्प असल्याने मोठ्या प्रमाणावर साधनसामग्री व मनुष्यबळ उपलब्ध आहे. मॉकिड्रलमध्ये संबंधित ठेकेदाराची साधनसामुग्री मनुष्यबळ अपेक्षित कालावधीत घटनास्थळी पोहोचली. तथापि, रात्रीच्या वेळी बचावकार्यासाठी फ्लडलाइटची गरज असल्याची निरीक्षक तहसीलदारांनी नोंदविले.
--------------------
या कर्मचाऱ्यांचा सहभाग
तलाठी, पोलीस पाटील ५.५२ वाजता (०७ मिनिट), महावितरण अधिकारी, कर्मचारी ५.५९ वा. (१४ मिनिट), तहसील कार्यालयाचे पथक ६.०१ (१६ मिनिट), पांढुर्ली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक ६.०४ वा.(१९ मिनिट), सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ६.०५ वाजता (२० मिनिट), समृद्धी महामार्ग पॅकेज १३, डम्पर ४, जेसीबी २, मजूर-२० हे ६.०८ वाजता (२३ मिनिट), पंचायत समितीचे पथक ६.११ वाजता (२६ मिनिट), नगर परिषद अग्निशामक वाहन व पथक ६.१२ वाजता (२७ मिनिट), पोलीस अधिकारी व कर्मचारी ६.१३ वाजता (२८ मिनिट) याप्रमाणे घटनास्थळी पोहचले.
-----------------------
फोटो ओळी- सिन्नरच्या घोरवड घाटात आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक करताना शोध, बचाव पथकातील कर्मचारी. (३० घोरवड)
300721\30nsk_18_30072021_13.jpg
३० घोरवड