सर्पाने फुस्कारल्यावर तरूणाचा ‘दस नंबरी’ लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 01:19 PM2019-11-28T13:19:43+5:302019-11-28T13:19:56+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील सर्पदंश झालेल्या तरूणाला दहा दिवसांनंतर वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील सर्पदंश झालेल्या तरूणाला दहा दिवसांनंतर वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. इगतपुरी धामणगाव येथील गणेश नंदू बरतड या २५ वर्षीय तरु णाला शनिवारी (दि.१६) रोजी शेतात काम करत असतांना भात कापणी यंत्र चालवतांना अतिविषारी सर्प दंश झाला होता. ही माहिती सरपंच शिवाजी गाढवे यांना कळताच सरपंच त्यांनी तात्काळ आपले सहकारी ज्ञानेश्वर कोंडूळे, राजू गाढवे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली व गणेशला तात्काळ एस.एम.बी.टी रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अतिविषारी सर्प दंश झाल्याने गणेशच्या शरीररातील रक्तवाहिन्यांमध्ये गाठ तयार होऊन रक्तवाहिन्या बंद पडल्या होत्या. त्यामुळे त्याचे शरीर पूर्ण काळे पडले होते. रक्तवाहिन्या बंद झाल्याने व शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेऊन बाहेरून आॅक्सिजन देण्यात आला.बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी दाखल केलेल्या तरु णावर लवकर उपचार करण्यात यावे यासाठी एस.एम.बी.टी रु ग्णालयाचे मुख्याधिकारी डॉ.हर्षल तांबे, मुख्य व्यवस्थापक कुर्हे, वरपे, डॉ.प्रदीप नाईक, डॉ.बागडे यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर मुख्याधिकारी डॉ.हर्षल तांबे यांच्या प्रयत्नामुळे व सर्वांच्याच धावपळीमुळे डॉ.माने यांच्या मार्फत उपचार करण्यात आले. गणेश हा रु ग्णालयात तब्बल दहा दिवस व्हेंटिलेटरवरती मृत्यशी झुंज देत होता. तात्काळ सुविधा देऊन योग्य उपचार झाल्याने तब्बल दहा दिवसानंतर डॉक्टरांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. आपल्या मुलाच्या जीव वाचला ही माहिती सर्प दंश रु ग्ण गणेश बरतड याच्या आई वडील नातेवाईकांना समजताच सर्वांनी मोकळा श्वास सोडला व सर्वांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
-----------------
तब्बल दहा दिवस व्हेंटिलेटरवरती ठेऊन बाहेरून प्राणवायू देऊन गणेशवर उपचार चालू होते.अखेर दहा दिवसाच्या संघर्षानंतर गणेश शुद्धीवर आला.त्याचा जीव वाचला यामध्ये आमचे ज्युनिअर डॉ, नर्स, स्टाफ यांचे अथक प्रयत्न होते याचे मला समाधान वाटते.
- डॉ.अनिल माने, एस.एम.बी.टी रु ग्णालय
--------------
आज पुन्हा एकदा डॉ.माने व त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर मृत्यच्या दारात असलेल्या गणेशचा प्राण वाचला.त्याचे समाधान वाटत आहे.
- शिवाजी गाढवे, सरपंच धामणगाव