जादूटोण्याच्या भीतीपोटी दुकाने बंद राहतात तेव्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:17 AM2021-01-16T04:17:52+5:302021-01-16T04:17:52+5:30
याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील जुने नाशिक परिसरातील सारडा सर्कल ते फाळके रोड यादरम्यान असलेल्या विविध जुन्या वस्तू विक्री ...
याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील जुने नाशिक परिसरातील सारडा सर्कल ते फाळके रोड यादरम्यान असलेल्या विविध जुन्या वस्तू विक्री तसेच लोखंड, पत्रा विक्रीच्या दुकानांच्या बंद शटरपुढे बुधवारी रात्री एक अज्ञात व्यक्ती येऊन काहीतरी उतारा ठेवून पळ काढत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले. गुरुवारी (दि.१४) सकाळी जेव्हा व्यापारी नेहमीप्रमाणे दुकाने उघडण्यासाठी आले असता, येथील पंधरा ते वीस दुकानांच्या शटरपुढे भारलेले तांदूळ, मिर्ची, राख अशा तत्सम वस्तूंचा ‘उतारा’ आढळून आल्याने सर्वच व्यापारी अवाक् झाले. त्यांच्या पायाखालून जमीन सरकली आणि त्यांनी दुकानांचे शटर बंदच ठेवणे पसंत केले. दरम्यान, यापैकी एका व्यावसायिकाचा लहान मुलगा अचानकपणे घरी आजारी पडला आणि वांट्या करू लागल्याने सर्वांमध्ये घबराट पसरली. त्यांच्या कुटुंबातील महिला वर्गदेखील धास्तावला. ही बाब जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांना समजली तेव्हा डॉ. टी. आर. गोराणे, प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, सुशीलकुमार इंदवे, महेंद्र दातरंगे, कृष्णा चांदगुडे आदींनी फाळके रोडवर धाव घेतली. यावेळी उपस्थित व्यावसायिकांचे त्यांनी समुपदेशन करत अंधश्रद्धेचा प्रकार लक्षात आणून दिला आणि त्यांच्या मनातील भीती घालविण्यास यश मिळविले. सकाळी भर बाजारात गर्दी जमल्याने भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनीही घटनास्थळी भेट दिली. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांसह व्यावसायिकांनी घडलेला प्रकार त्यांच्यापुढे कथन केला. यावेळी संबंधित व्यावसायिकांच्या वतीने आसिफ सय्यद, मुदस्सर सय्यद यांनी त्या अज्ञात संशयिताविरुद्ध तक्रार पोलिसांकडे केली आहे. सीसीटीव्ही फुटेजअधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.
--इन्फो--
निकालासाठी दुकानांपुढे केला ‘उतारा’
व्यापारी वर्गाचा जागेवरून सुरू असलेला वाद न्यायप्रविष्ट आहे. या खटल्याची सुनावणी जवळ आली असून, न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने यावा यासाठी भोंदू बाबाच्या सांगण्यावरून अज्ञात व्यक्तीने येथील काही दुकानांपुढे ‘उतारा’ अमावास्येचा मुहूर्तावर आणून ठेवल्याची परिसरात चर्चा रंगली होती.
---
फोटो आर वर १४जुने नाशिक नावाने सेव्ह आहे.