निर्बंधाचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुली बोहल्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:11 AM2021-06-21T04:11:53+5:302021-06-21T04:11:53+5:30
संदीप भालेराव नाशिक : कोरोनामुळे लग्न सोहळ्यावर निर्बंध असल्याचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलींचे विवाह लावून दिले जात असल्याची गंभीर ...
संदीप भालेराव
नाशिक : कोरोनामुळे लग्न सोहळ्यावर निर्बंध असल्याचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलींचे विवाह लावून दिले जात असल्याची गंभीर बाब लॉकडाऊनच्या काळात समेार आली आहे. मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत अशा प्रकारचे १९ प्रकार उघडकीस आले असून या अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यात यंत्रणेला यश आले आहे. याप्रकरणी वधू-वरांसह पालकांचे समुपदेशन करण्यात आले तर तीन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणांवरून कमी खर्चात आणि कमी लोकांच्या उपस्थितीत विवाह करावा लागत असल्याने ही संधी साधत अनेकांनी अल्पवयीन मुलीच्या विावाहाचे बेत आखल्याचे धक्कादायक वास्तव समाेर आले आहे. मात्र काही जागरूक नागरिकांच्या मदतीने अशा प्रकारचे विवाह रोखण्यात चाईल्डलाईन आणि महिला बालविकास कार्यालयाच्या बाल विकास कक्षाला यश आले आहे. बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असून अठरा वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलीचा विवाह करणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही. त्यामुळे संबंधितांवर बालविवाह प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. असे असतांनाही लॉकडाऊनमध्ये आलेले निर्बंध तसेच आर्थिक संकटामुळे अल्पवयीन मुलींचे विवाह लावून देण्याचे प्रकार जिल्ह्यात घडले आहेत.
गेल्या मार्च महिन्यात ६, एप्रिलमध्ये ९, तर मे महिन्यात ४ असे एकूण १९ प्रकार जिल्ह्यात समोर आले. गावातील जागरूक नागरिकांनी याप्रकरणी वेळीत चाईल्ड लाईन तसेच महिला बालविकास कार्यालयाला याबाबतची माहिती दिल्याने अल्पवयीन मुलगी असल्याची खात्री झाल्यानंतर असे विवाह रोखण्यात आले आहेत. या प्रकरणांची चौकशी केल्यानंतर अल्पवयीन विवाह करण्याबाबतचे अनेक सामाजिक प्रश्न यानिमित्ताने समोर आले आहेत. बेरोजगारी, गरिबी, मुलींबाबतचा दृष्टिकोन, मुलाकडून करण्यात येणारा लग्नाचा खर्च ,तसेच शिवाय अशा लग्नाची चर्चा न होता नातेवाईकांमध्येच लग्न उरकण्याची संधी असल्यानेदेखील अनेकांनी ही संधी साधण्याचा प्रयत्न समोर आला.
--इन्फो--
तालुकानिहाय प्रकरणे
नाशिक: ४,
सिन्नर, ३,
त्र्यंबकेश्वर २,
मालेगाव, ३,
दिंडोरी २,
येवला १
निफाड १
चांदवड २
जिल्ह्याबाहेरील १
--कोट--
प्राप्त झालेल्या तक्रारींची शहानिशा करून संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींचे विवाह रोखले जातात. आपण जाणीव जागृती करीत असलो तरी असे प्रकार समाजात घडत असतात अशावेळी सर्व खात्री करून स्थानिक यंत्रणेच्या माध्यातून याबाबतची कार्यवाही केली जाते. शहरी आणि ग्रामीण भागातील बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांना कळविले जाते.
-सुरेखा पाटील, जिल्हा महिला बालविकास अधिकारी.
--कोट--
जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या विवाहाच्या अनेक तक्रारी चाईल्ड लाईन कडे येत असल्या तरी त्यामध्ये शासकीय यंत्रणा आणि नागरीकांची भुमिका महत्वाची ठरते. जिल्हा महिला बालविकास कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, ग्राम बाल संरक्षण समिती यांच्याकडून शहानिशा करून पुढील कार्यवाही केली जाते. तक्रार दिलेल्याचे नाव गोपनीय ठेऊन असे प्रकार रोखले जाते.
- प्रविण आहेर, चाईल्डलाईन.
--इन्फो--
अशी आहेत कारणे
१) हालाखीची आर्थिक परिस्थिती
२) घरातील एक सदस्य कमी करण्याची मानसिकता
३) मुूलीचे प्रेमसंबध होण्याची पालकांना भीती
४) मुलाकडून लग्नाचा खर्च करण्याची तयारी
५) लॉकडाऊनमुळे कमी खर्च