बारावीच्या गुणपत्रिका मिळणार केव्हा ? विद्यार्थ्यांना प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 06:23 PM2020-07-23T18:23:51+5:302020-07-23T18:28:17+5:30
बारावीच्या गुणपत्रिका कधी मिळणार याविषयी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. निकाल लागून आठवडाभराचा कालावधी उलटूनही विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका मिळालेल्या नाही. त्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेशांची प्रक्रियाही रखडली आहे.
नाशिक : बारावीचा निकाल लागून आठवडाभराचा कालावधी उलटूनही विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका मिळालेल्या नाही. त्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेशांची प्रक्रियाही रखडली असून, बारावीच्या गुणपत्रिका कधी मिळणार याविषयी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दरम्यान, विभागीय शिक्षण मंडळाला शनिवारपर्यंत गुणपत्रिका मिळणार असून, या गुणपत्रकांचे वितरणासाठी नाशिक विभागीय मंडळाकडून नियोजन करण्यात येत आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल १६ जुलैला आॅनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला असला तरी अद्याप विद्यार्थ्यांना अजूनही गुणपत्रिका प्राप्त झालेल्या नाही. नाशिक विभागातून ८९ हजार २५ मुले व ६७ हजार ६६४ मुले असे एकूण १ लाख ५६ हजार ७८९ विद्यार्थी बारावीच्या परीक्षे प्रविष्ट झाले होते. त्यौपकी असे एकूण १ लाख ३९ हजार ३४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, नाशिक जिल्ह्यातील ७० हजार १२९ विद्यार्थ्यांपैकी ६२ हजार ७३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील ५९ कनिष्ठ महाविद्यालयांमधील १० हजार २७ उत्तीर्ण विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी गुणपत्रिकांची प्रतीक्षा लागलेली असून, अजूनही थेट विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका केव्हा मिळणार याविषयी विभागीय मंडळाने कोणतीही स्पष्टता दिलेली नाही. आॅनलाइन निकाल जाहीर करतानाच विद्यार्थ्यांना गुणपत्रिका क धी मिळणार हे स्पष्ट केले जाते. परंतु, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास दीड महिने निकाल लांबला असून, आता गुणपत्रिका प्रत्येक महाविद्यालयापर्यंत पोहोचविण्याच्या प्रक्रियेतही विलंब होणार आहे. दरवर्षी गुणपत्रिका प्राप्त झाल्यानंतर महाविद्यालयांमध्येच विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण केले जाते. यावर्षी महाविद्यालयांना गुणपत्रिका मिळाल्यानंतरही कोरोनाच्या संकटामुळे त्यांचे वाटप कसे होणार याविषयी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.