आरटीईची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:15 AM2021-05-19T04:15:44+5:302021-05-19T04:15:44+5:30
नाशिक : बालकांचा शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्य शाळांमधील आर्थिक दुर्बल व वंचित ...
नाशिक : बालकांचा शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्य शाळांमधील आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील मुलांसाठी
राखीव २५ टक्के जागांवर २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी सोडत जाहीर झाल्यानंतर प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आता पुढील प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार याची प्रतीक्षा लागली आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयाने ७ एप्रिलला प्रवेशासाठीची सोडत जाहीर केली असून, सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १५ एप्रिलपासून एसएमएसही प्राप्त झाले आहेत. सोडतीत राज्यातील ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून, यात नाशिकमधील ४२०८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या कागदपत्रे पडताळणीची प्रक्रिया प्रलंबित असून, प्रवेशाची संधी मिळालेल्या या विद्यार्थ्यांच्या पालकांना आता कागदपत्र पडताळणी प्रक्रिया कधी सुरू होणार याची प्रतीक्षा लागली आहे. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी पडताळणी समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या निर्बंधांमुळे सध्या ही सर्व प्रवेशप्रक्रिया ठप्प झाली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी देशव्यापी टाळेबंदी सुरू असताना प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली नाही. टाळेबंदी शिथिल झाल्यावर प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची सूचना संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
इन्फो -
जिल्ह्यातील आरटीईची स्थिती
शाळा - ४५०
उपलब्ध जागा - ४,५४४
प्राप्त अर्ज - १३,३३०
लॉटरीत निवड - ४,२०८