बेशिस्त वाहनचालकांचा उन्माद केव्हा थांबणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 01:02 AM2018-07-10T01:02:52+5:302018-07-10T01:03:16+5:30
कानात हेडफोन, काहींच्या कानांवर मोबाइल अन् काहींच्या हातात सिगारेट अशा अवस्थेत बेधुंद दुचाकीस्वार कॉलेजरोडवर उन्माद करतात. तसेच चारचाकी वाहनचालकदेखील याला अपवाद नसून बेभानपणे मोटारीतील साउंडसिस्टम वाजवित हवेच्या वेगाशी स्पर्धा करत वाहने दामटवितात.
नाशिक : कानात हेडफोन, काहींच्या कानांवर मोबाइल अन् काहींच्या हातात सिगारेट अशा अवस्थेत बेधुंद दुचाकीस्वार कॉलेजरोडवर उन्माद करतात. तसेच चारचाकी वाहनचालकदेखील याला अपवाद नसून बेभानपणे मोटारीतील साउंडसिस्टम वाजवित हवेच्या वेगाशी स्पर्धा करत वाहने दामटवितात. यावेळी चार रस्त्यांचीही तमा ते बाळगत नाही. परिणामी प्रिं. टी. ए. कुलकर्णी चौक व मॉडेल चौक अपघातांचे केंद्रबिंदू बनले आहेत. बेभानपणे वाहने दामटविण्याचे प्रकार कॉलेजरोडवर सर्रासपणे सुरूच आहे. वाहतुकीच्या सर्व नियमांची पायमल्ली करत चुकीच्या दिशेने वाहने चालविणे, अरुंद चौकातील वाहतूक बेटाभोवती वळण न घेता दुभाजक संपल्यानंतरच वाहने वळविणे, वेगमर्यादेचे कुठलेही भान न बाळगणे अशा विविध समस्यांमुळे कुलकर्णी व मॉडेल या दोन चौकांमध्ये सातत्याने वाहनकोंडी व अपघाताच्या लहान- मोठ्या घटना घडत असतात. आदर्श शिशू शाळेपासून तर कॅनडा कॉर्नरपर्यंत कॉलेजरोडवरील सर्व चौक हे अरुंद असून प्रत्येक चौकाभोवती जोड रस्ते आहेत. तसेच चौकांमध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांची दुकाने असल्यामुळे सतत वाहनांची वर्दळ असते. रस्त्यालगत चारचाकी, दुचाकी चौकाभोवती सर्रासपणे उभ्या केलेल्या दिसून येतात. पोलिसांनी या भागातील चौकांमध्ये विशेष कारवाई करत वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाºयांना चाप लावण्याची मागणी अनेक महिन्यांपासून होत आहे.
दोन वर्षांपूर्वी कुलकर्णी चौकापासून काही मीटर अंतरावर अशाच एका भरधाव वाहनाच्या धडकेत एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयाच्या प्राध्यापकाला आपला प्राण गमवावा लागला होता. त्यानंतर कॉलेजरोडवरील बेशिस्त वाहतुकीच्या प्रश्नाने जोर धरला होता. नव्याचे नऊ दिवस या घटनेनंतर पोलिसांनी कारवाईचा देखावा केला. त्यानंतर मात्र कुलकर्णी चौकातील नाकाबंदीही पोलिसांनी हटविली आहे. तसेच शहरातील अन्य भागातून रस्त्यावरील वाहने सर्रासपणे उचलून नेली जात असली तरी कॉलेजरोडवर मात्र टोइंग करणारे फिरकत नसल्याचे चित्र पहावयास मिळते.
चौकांभोवतीचा विळखा हटवा
कॉलेजरोडवरील टी. ए. कुलकर्णी चौक, एचपीटी कॉलेजच्या पुढील चौक, मॉडेल चौक हे सर्व अरुंद स्वरूपाचे चौक आहेत. या ठिकाणी येणाºया सर्वच रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ अधिक असते. या चौकांभोवती असलेला अतिक्रमणाचा विळखा व अवैध पार्किंगचा वेढा हटविण्याची मागणी होत आहे. अतिक्रमणाचा विळखा व अवैध पार्किंगमुळे वाहतूक कोंडीला निमंत्रण मिळून अपघाताच्या घटना घडतात. शनिवार व रविवारी संध्याकाळपासून रात्रीपर्यंत वाहतुकीची कोंडी या ठिकाणी पहावयास मिळते.