भाजपा कुठे फेडणार हे पाप?
By admin | Published: February 12, 2017 12:41 AM2017-02-12T00:41:04+5:302017-02-12T00:41:15+5:30
रामदास कदम : सिडकोतील सभेत केली टीका
सिडको : भाजपाने हल्ली गुंडांना पक्षात प्रवेश देऊन त्यांना पवित्र करणे व जनतेला त्रास देण्याचे उद्योग अवलंबिले असून, हे पाप भाजपा कसे फेडणार, असा सवाल पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ मधील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, श्रमिक सेनेचे शिवाजी भोर, महिला आघाडीच्या महानगरप्रमुख डॉ. शामला दीक्षित, सुभाष गायधनी आदि उपस्थित होते. रामदास कदम पुढे म्हणाले, भाजपा ही गेल्या पंचवीस वर्षांपासून सेनेच्या पाठीत खंजीर खुपसत आहे. देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री हेदेखील सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करीत आहे. अच्छे दिन येतील, देशातील काळेधन बाहेर येईल, असे मोदी सांगत होते. परंतु प्रत्यक्षात असे काहीच झाले नाही. याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवरच झाला. गोध्रा हत्त्याकांड घडल्यावर नरेंद्र मोदींना भाजपा पक्षातून काढणार होते. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी मध्यस्थी करीत मोदींना काढू नये, असे सांगितले. विधानसभेत युती ठेवायची नाही ही भाजपाची चाल होती, परंतु त्यांनी शेवटपर्यंत गाफील ठेवले. यानंतरही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ६३ आमदार निवडून आले. भाजपा सरकार हे वेगळा विदर्भ करण्याची भाषा करीत असून, अखंड महाराष्ट्राची शपथ घेतात. यामुळे यापुढील काळात कोणीही गाफील राहणार नसून, आदेश येताच राजीनामे देणार असल्याचेही कदम यांनी सांगितले.
शिवसेनाप्रमुखांनी छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे यांना मोठे केले. ज्यांनी ज्यांनी सेनाप्रमुखांना त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांचे आज काय हाल होत आहेत, ते सर्वश्रृत आहे. यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत भाजपासह राष्ट्रवादी, मनसे या पक्षांना भुईसपाट होतील असा दावाही रामदास कदम यांनी केले. यावेळी सेनेचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी प्रास्ताविक केले.आभार श्यामकुमार साबळे यांनी मानले. हर्षा बडगुजर व चारूशीला गायकवाड यांनी स्वागत केले. (वार्ताहर)