जमावबंदी, संचारबंदी कुठं आहे रे भाऊ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:11 AM2021-07-21T04:11:56+5:302021-07-21T04:11:56+5:30
शहरासह विविध उपनगरांमध्येही रात्री उशिरापर्यंत रेलचेल दिसून येते. विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून रस्त्यांच्या कडेला वाहने उभी करून दुपारी ४ वाजेनंतरही ...
शहरासह विविध उपनगरांमध्येही रात्री उशिरापर्यंत रेलचेल दिसून येते. विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून रस्त्यांच्या कडेला वाहने उभी करून दुपारी ४ वाजेनंतरही व्यवसाय थाटलेला पाहावयास मिळतो, तसेच शहरातील बहुतांश दुकानांमध्येही शनिवार, रविवार मागील दाराने सर्रासपणे व्यवसाय सुरू असल्याचे चित्र सहजरीत्या दिसत असले तरी याकडे मात्र संबंधित यंत्रणेकडून कानाडोळा का केला जातो? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी, संचारबंदी आणि वीकेंड लॉकडाऊनचे निर्बंध हे शिथिल नव्हेत, तर थेट मोडीत काढले गेले की काय? अशी स्थिती शहरातील एकंदरीत चित्र बघता पाहावयास मिळते. दैनंदिन भाजीबाजारांमध्येही गर्दी उसळताना नजरेस पडते. मात्र, जणू आता कोरोना गेला की काय, म्हणून अशा गर्दीकडे पोलीस यंत्रणेकडून डोळेझाक केली जात आहे. शहरासह उपनगरांमध्येही यापेक्षा फारसे काही वेगळे चित्र नाही. पोलीस वाहनाचा सायरन केवळ औपचारिकता म्हणून दुपारी ४ वाजेनंतर भ्रमंतीदरम्यान वाजविला जातो; अन्यथा या सायरनच्या आवाजाचा फारसा काही प्रभाव आता दिसत नाही. पोलीस वाहन आले की, शटर खाली, वाहन गेले की पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या...’ याप्रमाणे शहरात सध्या चित्र पाहावयास मिळत असल्याने जमावबंदी, संचारबंदी, वीकेंड लॉकडाऊन, अंशत: लॉकडाऊन हे सर्व नियम केवळ कागदोपत्रीच उरतात, हेच खरे!
-अझहर शेख