जिल्ह्यातील नववीतील २९९० विद्यार्थी गेले कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:19 AM2021-06-16T04:19:16+5:302021-06-16T04:19:16+5:30
नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे नाशिक जिल्ह्यात गतवर्षी नववीची परीक्षाच झाली नाही, त्यामुळे सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ५२ हजार ८०३ ...
नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे नाशिक जिल्ह्यात गतवर्षी नववीची परीक्षाच झाली नाही, त्यामुळे सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ५२ हजार ८०३ मुले व ४६ हजार १४६ मुली असे एकूण ९८ हजार ९४९ विद्यार्थी दहावीत दाखल झाले. परंतु यातील केवळ ९५ हजार ९५९ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज केले. त्यामुळे नववी उत्तीर्ण झालेले २ हजार ९९० विद्यार्थी गेले कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे नाशिक जिल्ह्यातील नववी उत्तीर्ण झालेले ९८ हजार ९४९ विद्यार्थी दहावीत प्रविष्ट झाले, यापैकी दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे त्यांचा निकाल मिळणार आहे. परंतु, यातील २ हजार ९९० विद्यार्थ्यांना विविध कारणांनी दहावीचा परीक्षा अर्ज करता आला नाही. त्यामुळे त्यांना परीक्षा झाली नसली तरी सध्या निकाल मिळू शकणार नाही. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्कासह परीक्षेच्या पूर्वसंध्येपर्यंत अर्ज करण्याची मुभा दिली होती. परंतु, कोरोना संकटामुळे परीक्षाच रद्द झाल्याने काही विद्यार्थ्यांनी अर्जच केले नाहीत. अशा विद्यार्थ्यांचे काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दहावीचा परीक्षा अर्ज न करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने स्थलांतरित विद्यार्थ्यांसोबतच विविध कारणांनी शैक्षणिक प्रवाहाबाहेर विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे मत, शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
-----
पॉईंटर
१) जिल्ह्यात नववी पास विद्यार्थी - ९८,९५९
दहावीसाठी अर्ज केलेले विद्यार्थी - ९५,९५९
-----
इनफो-
पटसंख्येचा घोळ
नववीपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्याला नापास केले जात नाही. त्यामुळे पहिलीत दाखल झालेला विद्यार्थी मध्ये शाळाबाह्य झाला तरी पटसंख्येसाठी काही ठिकाणी अशा विद्यार्थ्यांना पटावरून वगळल्याचे दाखविले जात नाही. त्यामुळे नववीपर्यंत पटसंख्येत फारसी तफावत दिसून येत नाही. परंतु दहावीच्या परीक्षेचे अर्ज करताना परीक्षेसाठी इच्छुक नियमित आणि पुनर्परीक्षार्थीच अर्ज करतात. त्यामुळे आकडेवारीतील फरक उघड होत असल्याचे मत शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.
----
इन्फो -
बालविवाह, आर्थिक चणचण, स्थलांतर
- जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागात अजूनही बालविवाह होत असल्याने या भागातून नववी उत्तीर्ण होऊनही अनेक मुली दहावीसाठी अर्ज करीत नाही. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थी संख्यात घट दिसून येते.
- कोरोनाच्या संकटामुळे अनेक कुटुंबांचा कमावत्या व्यक्तीच्या रूपाने आधार हिरावला गेला, तर काहींना बेरोजगारीचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत आर्थिक चणचण जाणविल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी दहावीचे ऑनलाइन शिक्षण आणि परीक्षेपासून दूर राहत अर्जच केला नाही.
- नाशिक जिल्ह्यात अनेक परप्रांतीय कुटुंब रोजगारासाठी स्थायिक झाले होते. परंतु, कोरोनामुळे रोजगार बंद झाल्यांचे स्थलांतर झाले. या कटुंबांसमवेत काही विद्यार्थ्यांचेही स्थलांतरण झाले. त्याचा परिणाम दहावीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर झाल्याचे दिसून येते.
-----
कोट-१
कोरोना महामारीचा प्रभाव
नववी उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी दहावी परीक्षेचा अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटल्याचे अचूक कारण कोरोना संकटामुळे स्पष्ट होऊ शकलेले नाही. काही विद्यार्थी अथवा त्यांच्या कुटुंबांना कोरोना संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर काही विद्यार्थी परीक्षेची तयारी झाली नाही म्हणून स्वत:च अर्ज करणेही टाळण्याची शक्यता असू शकते. स्थलांतरित विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा होती. संबधित शाळांच्या मदतीने त्यांना अर्ज करणे शक्य होते. आता मंडळाला जे अर्ज प्राप्त आहेत, त्यांचाच निकाल तयार होणार आहे.
- के. बी. पाटील. अध्यक्ष , विभागीय शिक्षण मंडळ, नाशिक
-----------