कुठे गेला मुंबई-आग्रा महामार्ग?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:14 AM2021-07-29T04:14:36+5:302021-07-29T04:14:36+5:30
इगतपुरी तालुका पावसाचे माहेरघर असल्याने या ठिकाणी महामार्गाचे काम चांगल्या प्रतीचे होणे फार गरजेचे असून सुद्धा दरवर्षी त्याच ठिकाणी ...
इगतपुरी तालुका पावसाचे माहेरघर असल्याने या ठिकाणी महामार्गाचे काम चांगल्या प्रतीचे होणे फार गरजेचे असून सुद्धा दरवर्षी त्याच ठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यांमधून वाट काढावी लागत असते. निकृष्ट दर्जाचे काम केल्याने दरवर्षी पावसाळ्यात महामार्ग या ठिकाणी गायब झालेला असतो. टोलनाका ते घाटनदेवीपर्यंत पाच किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यात महामार्ग हरवला असल्याचे चित्र दिसत आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या खड्ड्यांमधून वाट काढताना वाहनांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मोठमोठे खड्डे पडल्याने दररोज अपघातांमध्ये वाढ झाली आहे. टोल प्रशासन हेतुपुरस्सर डोळेझाक करीत असून कुठल्याही प्रकारचे काम करताना दिसत नाही. त्यामुळे स्थानिक वाहनचालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
इन्फो
टोल प्रशासनावर निशाणा
पहिल्याच पावसामध्ये मोठ्या प्रमाणात महामार्गाची चाळण झाली असून येत्या काळात पावसात परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे टोल प्रशासनाने महामार्गाची दुरुस्ती करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरणार असल्याचे उपजिल्हाप्रमुख संदीप किर्वे यांनी इशारा दिला आहे. टोलनाका प्रशासनाकडे खड्ड्यामुळे जाब विचारणाऱ्या चालकांची बाचाबाची नित्याचीच झाली असून, टोल वसुली करून रस्त्यावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाविरुद्ध स्थानिक नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या खड्ड्यामुळे मोठा अपघात झाल्यास याकरिता टोल प्रशासन जबाबदार असणार असल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले.
कोट :
महामार्गाची चाळण झालेली असून या महामार्गावरून मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सुस्त प्रशासनाने त्वरित महामार्गाची दुरुस्ती करावी, अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन करण्यात येईल. या खड्ड्यामुळे मोठे अपघात झाल्यास त्याला टोल प्रशासन जबाबदार असेल.
संदीप किर्वे, उपजिल्हाप्रमुख, मनसे
फोटो- २८ मुंबई-आग्रा रोड
280721\28nsk_19_28072021_13.jpg
फोटो- २८ मुंबई आग्रा रोड