चरस, कोकेनचा साठा आणला कोठून अन् किती?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 01:56 AM2021-07-07T01:56:11+5:302021-07-07T01:56:34+5:30
इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री हीना पांचालसह अन्य वीस संशयितांना इगतपुरी न्यायालयाने जिल्हा सत्र न्यायालयाकडे मंगळवारी (दि.६) संध्याकाळी वर्ग केले. विशेष न्यायालयात संध्याकाळी साडेसात वाजेपासून तर रात्री साडेनऊ वाजेपर्यंत चाललेल्या सुनावणीनंतर हीनासह अन्य संशयितांना कुठलाही दिलासा मिळू शकला नाही.
नाशिक : इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री हीना पांचालसह अन्य वीस संशयितांना इगतपुरी न्यायालयाने जिल्हा सत्र न्यायालयाकडे मंगळवारी (दि.६) संध्याकाळी वर्ग केले. विशेष न्यायालयात संध्याकाळी साडेसात वाजेपासून तर रात्री साडेनऊ वाजेपर्यंत चाललेल्या सुनावणीनंतर हीनासह अन्य संशयितांना कुठलाही दिलासा मिळू शकला नाही. न्यायालयाने या सर्व संशयितांचा ताबा पुन्हा ग्रामीण गुन्हे शाखेला दिला. बुधवारी (दि.७) सकाळी या रेव्ह पार्टीशी संबंधित एकूण २५ संशयित आरोपींना जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
नाशिकमधील इगतपुरीत बॉलिवूड, टीव्ही कलाकार व मालिकांमध्ये काम करणाऱ्या एकूण २२ तरुण-तरुणींकडून गांजा, हुक्का, चरस, कोकेन यांसारख्या मादक अमलीपदार्थांचे सेवन केले जात होते. या दोन दिवसीय हवाईयन रेव्ह पार्टीची पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या पथकाने कुणकुण लागताच गेल्या शनिवारी मध्यरात्री उधळून लावली होती. या छाप्यात पोलिसांनी अभिनेत्री हीना पांचालसह एकूण २२ संशयितांना स्काय ताज, स्काय व्हिला या बंगल्यांमधून रंगेहात ताब्यात घेतले. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी काही संशयितांविरुद्ध प्रथमदर्शनी कोटपा, दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला, तर काही संशयितांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये कारवाई केली.
दरम्यान, मंगळवारी या संशयितांना पुन्हा जिल्हा व सत्र न्यायाधीश नाईक-निंबाळकर यांच्या न्यायालयासमोर उभे करण्यात आले. जिल्हा न्यायालयात विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी जोरदार युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत गुन्हे शाखेला या सर्व संशयितांना एका रात्रीकरिता ताबा दिला.
--इन्फो--
...असा झाला युक्तिवाद
पोलिसांच्या छापा पडला असता संशयितांनी बंगल्याच्या आवारातील स्विमिंगपुलमध्ये चरस, कोकेनसारखे ड्रग्ज फेकून दिले.
नायजेरीयन सराईत गुन्हेगार उमाही पीटर याच्याशी यांचा कसा संपर्क झाला? याचा तपास करावयाचा आहे.
सराईत गुन्हेगार पीटरचे दोन साथीदार अद्यापही फरार असून, त्यांचाही शोध घेतला जात आहे.
स्विमिंग पुलमध्ये किती प्रमाणात ड्रग्ज फेकले याची तपासणी करावयाची आहे, तसेच या सर्व संशयितांच्या रक्त, लघवीच्या नमुन्यांच्या चाचणीचा अहवालही प्रतीक्षेत आहे.
---कोट--
एनडीपीएसच्या गुन्ह्याच्या कायदेशीर तरतुदीप्रमाणे तालुका न्यायालयाकडून सर्व वीस संशयितांची सुनावणी जिल्हा न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली. संध्याकाळी साडेसात वाजता विशेष न्यायालयापुढे सुनावणीला प्रारंभ झाला. ही सुनावणी सव्वानऊ वाजेपर्यंत चालली. साक्षीदारांच्या जबाबानुसार दोन दिवस संशयितांनी सतत अमलीपदार्थांचे सेवन केल्याची बाब पुढे आली आहे. या रेव्ह पार्टीसाठी किती प्रमाणात चरस, कोकेनसारखे अमलीपदार्थ आणले गेले तसेच नायजेरियन गुन्हेगारांशी यापैकी कोणाचा व कसा संबंध आला? अशा विविध महत्त्वाच्या बाबींचा तपास सुरू असल्याने न्यायालयाने पुन्हा ग्रामीण गुन्हे शाखेकडे संशयितांचा ताबा दिला.
-अजय मिसर, विशेष सरकारी वकील