गेल्या सरकारच्या कर्जमाफीतील चारशे कोटी कोठे गेले ?
By श्याम बागुल | Published: December 26, 2019 06:43 PM2019-12-26T18:43:48+5:302019-12-26T18:46:56+5:30
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मंत्रालयातील एकवटली जाणारी मंत्र्यांची व सनदी अधिकाºयांचे अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला तर सुधाकरराव नाईक यांनी मंत्रिपातळीवर असलेल्या सुमारे शंभरहून अधिक अधिकार जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांना बहाल करून त्यांचे बळकटीकरण केले.
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली असून, प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा लाभ होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे दीड लाखाहून अधिक शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल व जवळपास दीड हजार कोटी रुपये शेतक-यांच्या कर्जखात्यात जमा होणार आहेत. सरकार शेतक-यांना कमी पडू देणार नाही, परंतु गेल्या सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या रकमेतून जिल्ह्यातील शेतक-यांच्या वाट्यासाठी आलेले चारशे कोटी कुठे गेले, असा सवाल करून ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ यांनी, सध्याच्या सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या रकमेला वाटा फुटता कामा नये, त्याचबरोबर पैसे शेतक-याच्या खात्यातच जमा होतील याची काळजी लोकप्रतिनिधी व अधिका-यांनी घ्यावी, अशा सूचना केल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे खासदार संजय राऊत होते. यावेळी बोलताना भुजबळ यांनी, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मंत्रालयातील एकवटली जाणारी मंत्र्यांची व सनदी अधिकाºयांचे अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला तर सुधाकरराव नाईक यांनी मंत्रिपातळीवर असलेल्या सुमारे शंभरहून अधिक अधिकार जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांना बहाल करून त्यांचे बळकटीकरण केले. त्यातून आज अनेक जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांनी आदर्श काम करून सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषदेचा विस्तार पाहता, नवीन इमारतीची ७० वर्षांनंतर गरज निर्माण होणे व नवीन इमारत उभी राहणे काळाची गरज असून, त्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली. शिवभोजन योजनेची माहितीही भुजबळ यांनी दिली. नाशिक महापालिका हद्दीतही शिवभोजन योजना सुरू केली जाईल. ही योजना सध्या प्रायोगिक पातळीवर राबविण्यात येत असून, ती राबविताना येणा-या अडचणी समजावून घेतल्या जातील व त्यानंतर त्यात आवश्यक बदल करण्यात येईल. मात्र योजना चांगल्या प्रकारे राबवायची असेल तर अधिकारी व लोकप्रतिनिधींनी त्याकडे बारकाईने लक्ष द्यावे, असे आवाहनही भुजबळ यांनी केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना खासदार संजय राऊत यांनी, महाविकास आघाडीचे सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली असून, त्यात शेतकरी, सामान्य व्यक्तींना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सत्तेवर सरकार कोणाचे आहे यापेक्षा त्या सरकारच्या कामांकडे पाहून त्याचे मूल्यमापन केले जावे, असे मत व्यक्त केले. नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढच्या वर्षी येतील त्याची हमी त्यांनी दिली. माजी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी, आपल्या अडीच वर्षांच्या राज्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाची कामे केल्याचे सांगितले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्याने आता आणखी चांगली कामे करून सामान्य व्यक्तीला सावरण्याचे काम करण्यात येणार असल्याचे भुसे म्हणाले. यावेळी प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी तर अध्यक्ष शीतल सांगळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी मनोगत व्यक्त केले.