कुठे रुग्ण ॲम्ब्युलन्समध्येच; तर कुणाला देईना डिस्चार्ज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:14 AM2021-04-10T04:14:35+5:302021-04-10T04:14:35+5:30
नाशिक : शासकीय आणि खासगी रुग्णालये ओसंडली, ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवीरचा साठा केवळ मोजक्याच मेडिकलमध्ये, अव्वाच्या सव्वा दर आकारणी ...
नाशिक : शासकीय आणि खासगी रुग्णालये ओसंडली, ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवीरचा साठा केवळ मोजक्याच मेडिकलमध्ये, अव्वाच्या सव्वा दर आकारणी हे गुरुवारचे चित्र शुक्रवारीदेखील कायम होते. काही रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळेना, कुणाला व्हेंटिलेटर मिळेना, कुणाला रेमडेसिवीर मिळेना असा सर्व गोंधळ आणि गदारोळ शहरात उडाला असून आरोग्य व्यवस्थेची पार वाताहात झाल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. या सर्व गदारोळात खासगी रुग्णालयांनी तर प्रचंड मनमानी चालवल्याने एका रुग्णाला पाच लाखांचा मेडिक्लेम असूनही थोड्या रकमेसाठी डिस्चार्ज मिळेना, तर कुठे व्हेंटिलेटर हव्या असलेल्या रुग्णाला शहरातील सर्व शासकीय, खासगी रुग्णालये फिरुनही व्हेंटिलेटर मिळत नसल्याने ॲम्ब्युलन्समध्येच तडफडत उपचार करून घेण्याची वेळ आली.
जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालयांचे बेड ओसंडून वाहत असून कॉरिडॉरमध्येदेखील बेडना जागा उरलेली नाही. ऑक्सिजन बेड तर तीन दिवसांपासून फुल्ल झाले आहेत. जोपर्यंत एखादा रुग्ण बरा होऊन घरी जात नाही किंवा कुणाचे निधन होत नाही तोपर्यंत त्या रुग्णालयातील बेड अन्य कुणाला मिळू शकत नाही, अशी परिस्थिती कायम असल्याने कुठून तरी ओळखपाळख काढून रुग्णालयांच्या सर्व अटी मान्य करीत रुग्णाला दाखल करून घेण्यावाचून संबंधितांच्या कुटुंबीयांसमोर कोणताही मार्ग उरलेला नसल्याचेच चित्र सर्वत्र दिसून येते.
इन्फो
रेमडेसिवीरसाठी आजही रांगा
शासनाच्या अन्न-औषध विभागाकडून १२ हजार रेमडेसिवीरची मागणी उत्पादकांकडे नोंदवण्यात आली होती. मात्र, अद्यापही हा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे केवळ काही मोजक्याच विक्रेत्यांकडे आता रेमडेसिवीर शिल्लक असल्याने त्या दुकानांपुढे रांगाच रांगा असे चित्र शुक्रवारीदेखील कायम होते. त्यामुळे नागरिकांना काही दुकानांमध्ये चढ्या दराने रेमडेसिवीर घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. काही दुकानांमध्ये ५ ते ६ हजार रुपयांना रेमडेसिवीरची विक्री होत असून नाईलाजास्तव नागरिकांना ते खरेदी करावे लागत आहेत.
इन्फो
रुग्णाला मिळेना व्हेंटिलेटर
शहरातील एका अत्यवस्थ रुग्णाला व्हेंटिलेटर लावणे आवश्यक असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्या रुग्णाला ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन सर्व मोठ्या हॉस्पिटल्सना नेऊन आणले तरी त्या रुग्णाला कुठेही व्हेंटिलेटरच नव्हे तर ऑक्सिजन बेडदेखील उपलब्ध होईना. सकाळपासून दुपारपर्यंत सर्व रुग्णालये फिरुनही कुठेच व्यवस्था होत नसल्याने सायंकाळपर्यंत त्या रुग्णाला ॲम्ब्युलन्समध्येच तडफडत राहण्यावाचून पर्याय उरला नव्हता.
इन्फो
रुग्णाला देईना डिस्चार्ज
शहरातील एका मोठ्या रुग्णालयात एका ज्येष्ठ नागरिकाचा ५ लाखांचा मेडिक्लेम आणि आगाऊ १ लाखांची रक्कम आधी भरलेली असूनही संबंधित नागरिक कोविडमुक्त झाल्यानंतरही रुग्णाला डिस्चार्ज देण्यास रुग्णालयाकडून टाळाटाळ केली जात होती. त्यांच्या कुटुंबीयांनी मनपा आयुक्तांकडे तक्रार दिल्यानंतर मनपा आयुक्तांनी महापालिकेचे अधिकारी पाठविल्यावर संबंधित रुग्णाला कसाबसा डिस्चार्ज मिळू शकला.