कुठे रुग्ण ॲम्ब्युलन्समध्येच; तर कुणाला मिळेना डिस्चार्ज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 01:36 AM2021-04-10T01:36:17+5:302021-04-10T01:37:49+5:30
शासकीय आणि खासगी रुग्णालये ओसंडली, ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवीरचा साठा केवळ मोजक्याच मेडिकलमध्ये हे गुरुवारचे चित्र शुक्रवारी दुसऱ्या दिवशी देखील कायम होते. काही रुग्णांना ऑक्सिजन बेड तर कुणाला व्हेंटिलेटर व कुणाला रेमडेसिवीर मिळेना अशी आरोग्य व्यवस्थेची पार वाताहात झाल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. या सर्व गदारोळात खासगी रुग्णालयांनी तर प्रचंड मनमानी चालवल्याने एका रुग्णाला पाच लाखांचा मेडिक्लेम असूनही थोड्या रकमेसाठी डिस्चार्ज मिळेना, तर कुठे व्हेंटिलेटर हव्या असलेल्या रुग्णाला सर्व रुग्णालये फिरुनही व्हेंटिलेटर मिळत नसल्याने ॲम्ब्युलन्समध्येच तडफडत उपचार करून घेण्याची वेळ आली.
नाशिक : शासकीय आणि खासगी रुग्णालये ओसंडली, ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवीरचा साठा केवळ मोजक्याच मेडिकलमध्ये हे गुरुवारचे चित्र शुक्रवारी दुसऱ्या दिवशी देखील कायम होते. काही रुग्णांना ऑक्सिजन बेड तर कुणाला व्हेंटिलेटर व कुणाला रेमडेसिवीर मिळेना अशी आरोग्य व्यवस्थेची पार वाताहात झाल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. या सर्व गदारोळात खासगी रुग्णालयांनी तर प्रचंड मनमानी चालवल्याने एका रुग्णाला पाच लाखांचा मेडिक्लेम असूनही थोड्या रकमेसाठी डिस्चार्ज मिळेना, तर कुठे व्हेंटिलेटर हव्या असलेल्या रुग्णाला सर्व रुग्णालये फिरुनही व्हेंटिलेटर मिळत नसल्याने ॲम्ब्युलन्समध्येच तडफडत उपचार करून घेण्याची वेळ आली.
जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालयांचे बेड ओसंडून वाहत असून कॉरिडॉरमध्येदेखील बेडना जागा उरलेली नाही. ऑक्सिजन बेड तर तीन दिवसांपासून फुल्ल झाले आहेत. जोपर्यंत एखादा रुग्ण बरा होऊन घरी जात नाही किंवा कुणाचे निधन होत नाही तोपर्यंत त्या रुग्णालयातील बेड अन्य कुणाला मिळू शकत नाही, अशी परिस्थिती कायम असल्याने ओळखपाळख काढून रुग्णालयांच्या सर्व अटी मान्य करीत दाखल करून घेण्यावाचून कुटुंबीयांसमोर कोणताही मार्ग उरलेला नसल्याचेच चित्र आहे.
रेमडेसिवीरसाठी रांगा कायम
शासनाच्या अन्न-औषध विभागाकडून १२ हजार रेमडेसिवीरची मागणी उत्पादकांकडे नोंदवण्यात आली होती. मात्र, अद्यापही हा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे केवळ काही मोजक्याच विक्रेत्यांकडे आता रेमडेसिवीर शिल्लक असल्याने त्या दुकानांपुढे रांगाच रांगा असे चित्र शुक्रवारीदेखील कायम होते. त्यामुळे नागरिकांना काही दुकानांमध्ये चढ्या दराने रेमडेसिवीर घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. काही दुकानांमध्ये ५ ते ६ हजार रुपयांना रेमडेसिवीरची विक्री होत असून नाईलाजास्तव नागरिकांना ते खरेदी करावे लागत आहेत.
रुग्णाची तडफड
एका अत्यवस्थ रुग्णाला शहरात व्हेंटिलेटर लावणे आवश्यक असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी दिंडोरी येथून त्या रुग्णाला ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन सर्व मोठ्या हॉस्पिटल्समध्ये नेले. मात्र, त्या रुग्णाला कुठेही व्हेंटिलेटरच नव्हे तर ऑक्सिजन बेडदेखील उपलब्ध होईना. सकाळपासून दुपारपर्यंत सर्व रुग्णालये फिरुनही कुठेच व्यवस्था झाली नाही अखेरीस दिंडोरी तालुक्यातच शासकीय रुग्णालयात या रुग्णाला बेड उपलब्ध झाला.
रुग्ण सोडण्यास नकार
एका मोठ्या रुग्णालयात एका ज्येष्ठ नागरिकाचा ५ लाखांचा मेडिक्लेम आणि आगाऊ १ लाखांची रक्कम आधी भरलेली असूनही संबंधित नागरिक कोविडमुक्त झाल्यानंतरही रुग्णाला डिस्चार्ज देण्यास रुग्णालयाकडून टाळाटाळ केली जात होती. त्यांच्या कुटुंबीयांनी मनपा आयुक्तांकडे तक्रार केल्याने मनपाचे अधिकारी तेथे गेल्यावर रुग्णाला डिस्चार्ज मिळाला.