पळा पळा चोर कुठे पुढे पळे तो..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:15 AM2019-03-23T00:15:36+5:302019-03-23T00:15:51+5:30
कुठे दुर्घटना घडली की ती कळवल्यानंतर वाजत गाजत येणाऱ्या पोलिसांमुळे चोर सावध होऊन पळून जातोच शिवाय परिसरातील नागरिक सांगत असतानाही पोलीस त्याची दखल घेत नाही
नाशिक : कुठे दुर्घटना घडली की ती कळवल्यानंतर वाजत गाजत येणाऱ्या पोलिसांमुळे चोर सावध होऊन पळून जातोच शिवाय परिसरातील नागरिक सांगत असतानाही पोलीस त्याची दखल घेत नाही, त्यामुळे चोरट्याचे फावते आणि तो पसार होतो, असा अनुभव दीपालीनगरवासीयांनी घेतला. काही दिवसांपूर्वी हा प्रकार घडला असून, पोलिसांच्या आगमनानंतरदेखील चोर शिताफीने पळून गेल्याने व अद्यापही तो पोलिसांच्या हाती न लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दीपालीनगर हा बराच विकसित भाग आहे. काही दिवसांपूर्वी या भागात मध्यरात्रीच्या सुमारास चोरटे शिरल्याचे कळताच परिसरातील नागरिक जागरूक झाले. आपलाशेजारी खरा पहारेकरी हे पोलिसांचेच घोषवाक्य असल्याने सारेच रस्त्यावर आले आणि चोरट्याला शोधू लागले. याचवेळी पोलिसांना कळवण्यात आले. परंतु पोलिसांनी शांततेत येण्याऐवजी सायरनची वर्दी देत दाखल झाले. त्यामुळे चोरटे अधिकच सावध झाले असावेत. नागरिकांना ते ज्या भागात गेल्याचा संशय होता ते सर्व सांगितल्यानंतर पोलिसांनी तत्काळ शोधापेक्षा चौकशीतच वेळ घालविला त्यानंतर चोरट्यांनी तेथून पळ काढला, असे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिसांचे शोध कार्य कमी पडल्यानंतर नागरिकांना पुन्हा अन्य भागांत चोरटे गेल्याचा संशय आला. त्यानुसार पुन्हा पोलिसांना कळवण्यात आले. पुन्हा ज्यादा पोलीस फाटा, बीट मार्शलसह त्याच पद्धतीने सायरनने वर्दी देत हजर झाला. बहुदा त्यामुळेच चोरटे पुन्हा अन्यत्र पळाल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. त्यामुळे चोर पोलीस असा पाठ शिवणीचा खेळ सुरू झाला. पहाटेपर्यंत शोध मोहीम राबविली गेली, परंतु ती अयशस्वी झाली. त्या दिवशी चोरटे गेले आणि नंतरही पोलिसांना सापडले नाही. त्यामुळे नागरिक मात्र चिंताक्रांत झाले असून चोरटे केव्हाही येतील या चिंतेने जागरण करू लागले आहेत.