कुठे निधी विक्री, तर कुठे ‘घरवापसी’
By Admin | Published: July 21, 2016 01:06 AM2016-07-21T01:06:23+5:302016-07-21T01:07:23+5:30
सदस्यांची निधी खर्चाची अशीही ‘भाऊगर्दी
’नाशिक : येत्या आॅगस्ट अखेरला आचारसंहिता लागण्याची चिन्हे दिसू लागल्याने जिल्हा परिषद सदस्यांचा सेस निधी खर्चासाठी आटापिटा सुरू झाला आहे. काही तालुक्यांतून सदस्यांनी अन्य तालुक्यात निधी ‘विक्री’ केल्याची चर्चा आहे. तर काही ठिकाणी हा विक्री केलेला निधी परत आणण्याचे पत्र देण्यासाठी सदस्यांची लगीनघाई सुरू झाल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषदेत याआधीही मागील वर्षी चांदवड, नाशिक व सिन्नर तालुक्यातील सदस्यांनी त्यांच्या सेसचा निधी इगतपुरी तालुक्यात विक्री केल्याची ओरड झाल्यानंतर काही सदस्यांनी आपला निधी आपल्याच गटात माघारी फिरविला होता. आता कार्यकाळ संपत आल्याने पुन्हा निवडून येऊ किंवा नाही, गटाचे आरक्षण सोयीने होणार की नाही, या सर्व चिंता विद्यमान सदस्यांना सतावू लागल्या असून, त्यातूनच हा निधी विक्रीचा फंडा समोर आल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे. आॅगस्ट अखेरीस पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची चर्चा सुरू होताच जिल्हा परिषदेत सदस्यांनी गर्दी केली असून, काही सदस्यांनी त्यांच्या वाटेला आलेला १८ लाखांचा निधी त्यांच्याच गटात खर्च करण्यासाठी अध्यक्षांच्या नावे पत्र दिले आहे. तर काही सदस्यांनी त्यांच्या गटाचा निधी अन्यत्र खर्च करण्यास संमती दिल्याचे पत्र अध्यक्षांकडे दिल्याचे समजते. सिन्नर तालुक्यातील दोघा सदस्यांनी त्यांचा निधी बागलाण तालुक्यात दिल्याची चर्चा असून, या सदस्यांना निवडून आणण्यासाठी ‘परिश्रम’ घेणाऱ्या शिवसेनेच्या एका नेत्याने हा निधी पुन्हा सिन्नर तालुक्यातच खर्च करण्याबाबत या दोन्ही सदस्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न केल्याचे बुधवारी चित्र होते. निफाड तालुक्यातीलही एका सदस्याने त्यांच्या गटातील निधी इगतपुरीत ‘खर्च’ करण्यास संमती दिल्याची चर्चा आहे.