कुठे प्रत्यक्ष स्नेहबंध, तर कुठे ई-रक्षाबंधन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:18 AM2021-08-23T04:18:22+5:302021-08-23T04:18:22+5:30
नाशिक : बहिण-भावाच्या स्नेहाच्या नात्यातील ऋणानुबंधांची वीण घट्ट करीत अवतरलेला रक्षाबंधनाचा सण सर्वत्र चैतन्य निर्माण करणारा ठरला. निर्बंध ...
नाशिक : बहिण-भावाच्या स्नेहाच्या नात्यातील ऋणानुबंधांची वीण घट्ट करीत अवतरलेला रक्षाबंधनाचा सण सर्वत्र चैतन्य निर्माण करणारा ठरला. निर्बंध शिथिल झाल्यानंतरचा पहिलाच मोठा सण असल्याने घराघरांमध्ये राखीपौर्णिमेचा उत्साह दिसून आला. नाशिकच्या परिघातच राहणाऱ्या बहिणींकडे जाऊन भावांनी रक्षाबंधन करून घेतले. तर दूरच्या गावी असलेल्या अनेक भावंडांनी व्हॉट्सॲपच्या व्हिडिओ कॉलिंगवर एकमेकांना शुभेच्छा देत राखीपौर्णिमेचा सण साजरा केला.
मनगटावर बांधलेल्या रेशमी बंधनातून भावा-बहिणीच्या अनोख्या विश्वासाचा धागा अधिक दृढ झाला. घरोघरी सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. अनेक घरांमध्ये सकाळीच तर काही घरांमध्ये सायंकाळी भगिनींना लाडक्या भाऊरायाला राखी बांधून औक्षण केले. काही सामाजिक संघटनांतर्फे वैविध्यपूर्ण उपक्रमांनी राखीपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. काही सामाजिक संस्थांनी वृक्षारोपण करून, काही संस्थांनी झाडांना राखी बांधून, काहींनी कोरोनायाेद्ध्यांना राखी बांधून तर काही सामाजिक संस्थांच्या वतीने पोलिसांना रक्षाबंधन करून राखीपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा केला. शहरातील मुख्य बाजारपेठेसह सर्व उपनगरांमधील बाजारपेठा, मिठाईची दुकाने, कपड्यांची दुकाने तसेच ज्वेलरीची दालनेदेखील ओसंडून वाहत होती.
इन्फो
साधली गाठीभेटीची संधी
कोरोनामुळे नाशिकच्याच परिघात राहूनदेखील एकमेकांची गाठभेट घेऊ न शकलेल्या भावंडांनी आणि परिवारांनी रविवारी आलेल्या सणाची पर्वणी साधत रक्षाबंधनासह एकमेकांच्या कौटुंबिक गाठीभेटी घेण्याची संधी साधली. अनेक कुटुंबांनी, तर सकाळच्या वेळी सहकुटुंब मिसळ आस्वाद किंवा दिवसभरात सोमेश्वर आणि धबधब्याचा आनंद लुटला. त्यामुळे रविवारी दिवसभर सोमेश्वर आणि नवश्या मंदिर परिसरातही नागरिकांची मोठी गर्दी होती.