कोणता झेंडा घ्यावा हाती?
By admin | Published: June 16, 2014 11:20 PM2014-06-16T23:20:03+5:302014-06-17T00:10:06+5:30
कोणता झेंडा घ्यावा हाती?
शैलेश कर्पे
सिन्नर
गेल्या आठवड्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व जनसेवा मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ वाजे यांच्या ‘मातोश्री’वर झालेल्या भेटीचे वृत्त तालुक्यात येऊन धडकल्यानंतर सिन्नरच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीला अजून सुमारे चार महिन्यांचा कालावधी असताना पक्षांतराचे वारे जोराने वाहू लागल्याचे चित्र आहे. त्यात वाजे यांचा कथित सेनाप्रवेश लांबणीवर पडल्याने व आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सेनाप्रवेशाची चर्चा म्हणा वा अफवा झडू लागल्याने येथील सारीच राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील सर्वच नेते पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत असताना महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना ५२ हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे कितीही नाही म्हटले तरी मोदींचा प्रभाव आणि भगव्या लाटेचा परिणाम तालुक्यातील जनतेने अनुभवला.
या लाटेवर स्वार होण्यासाठी विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्वच उमेदवारांची धडपड सुरू झाल्याचे चित्र आहे. युतीच्या संसारात सिन्नर मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने शिवसेना प्रवेशासाठी अनेकजण आतुर झाले आहेत. मात्र उमेदवारीचा निर्णय आत्ताच घेतला जाणार नसल्यामुळे साराच संभ्रम दाटला आहे.
लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराला मिळालेले ५२ हजारांचे मताधिक्य सर्वांनाच शिवसेनेकडे आकर्षित करीत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत माणिकराव कोकाटे कॉँग्रेसचे उमेदवार होते तर प्रकाश वाजे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. या चुरशीच्या लढतीत कोकाटे यांनी निसटता विजय मिळविला होता. यावेळी केंद्रात सत्ताबदल झाल्याने त्याचा कित्ता राज्यात गिरविला जाऊ शकतो या भीतीने कोकाटे गटाने राजाभाऊ वाजे यांच्या संभाव्य सेना प्रवेशाचा काही प्रमाणात का होईना धसका घेतल्याची चर्चा आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी वाजे यांच्याऐवजी शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख विजय करंजकर किंवा पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब वाघ यांना उमेदवारी मिळावी यादृष्टीने काहींनी हालचाली सुरू केल्याचे समजते.
तालुक्यात शिवसेनेला असलेले पोषक वातावरण पाहता कोकाटे यांनीच शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी कोकाटे समर्थकांचा एक गट प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. वाजे यांना शिवसेनेत प्रवेश देण्यापूर्वी शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले जाणार आहे. त्यामुळे वाजे यांचा सेनाप्रवेश लांबणीवर पडल्याचे कळते. वाजे यांचा सेनाप्रेवश लांबण्यामागे कोकाटे यांच्या शिवसेनाप्रवेशाची अफवा पसरवली जात आहे. मात्र कोकाटे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते.
कोकाटे यांच्यासोबत दोन हात करण्याचा वाजे यांचा निर्धार असल्याने कोकाटे कोणत्याही पक्षात गेले किंवा आहे तेथेच थांबले तरी वाजे यांची त्यांच्याविरोधातली उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
एकंदरीतच सिन्नरच्या नेत्यांची अवस्था लाटेवर स्वार होण्याची असली तरी महायुतीचे (शिवसेनेचे) तिकीट कोणाला तरी एकालाच मिळणार आहे. त्यामुळे ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ अशी अवस्था कोकाटे यांच्यासह वाजे, आव्हाड, वाघ यांची झाली आहे...