बस बंद असताना पोस्टाची गाडी पोहोचली गावागावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:20 AM2021-09-16T04:20:00+5:302021-09-16T04:20:00+5:30
नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे प्रवासी वाहतुकीवर निर्बंध असताना आणि आताही प्रवासी संख्येअभावी गावखेड्यात एस.टी. बस पोहोचत नसल्याने टपाल खात्याची ...
नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे प्रवासी वाहतुकीवर निर्बंध असताना आणि आताही प्रवासी संख्येअभावी गावखेड्यात एस.टी. बस पोहोचत नसल्याने टपाल खात्याची मेल गाडी मात्र गावागावात पोहोचत आहेत. सहा गाड्यांच्या माध्यमातून गावकऱ्यांपर्यंत त्यांची पत्रे, पार्सल आणि महत्त्वाची कागदपत्रे पोहोचत आहेत.
कोरोनाच्या दोन्ही लाटांत राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसची प्रवासी वाहतूक पूर्णपणे कोलमडली. त्यामुळे महामंडळाचा आर्थिक ताळेबंदही डळमळीत झाला. प्रवासी वाहतुकीला परवानगी नसल्याने आणि नंतर प्रवासीच बसमध्ये येत नसल्याचा परिणाम समोर आल्याने बसच्या फेऱ्या कमी करण्याची तसेच थांबविण्याची वेळ आली. ज्या एस.टी.च्या भरवशावर टपाल खात्याच्या टपालाची ने-आण होत होती त्याच्यावरही परिणाम होऊ लागल्याने टपाल खात्याने आपल्या गाड्या सज्ज केल्या आणि आता एस.टी.च्या मार्गावर अनेक टपाल खात्याची लालरंगाची ‘मेल’गाडी धावत आहे.
जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या पेठ, सुरगाणा, हरसूलपर्यंत लोकांच्या घरापर्यंत टपाल पाेहोचत आहेत. कळवण, मुसळगाव, मालेगाव, मनमाड, नांदगाव, येवला, पिंपळगावमध्ये देखील टपाल खात्याने आपली सेवा दिल्याने दूरपर्यंत लोकांना टपालाची सुविधा उपलब्ध झाली. बस बंद असल्याचा कोणताही परिणाम होऊ नये म्हणून सहा मेल गाड्यांच्या माध्यमातून अतिरिक्त ड्यूटी करीत कर्मचारी गावागावात पोहोचत आहेत.
--इन्फो--
औषध वितरणाला अधिक प्राधान्य
टपालातून महत्त्वाचे रजिस्टर, पुस्तके, मासिके, बिले जाण्याबरोबरच औषधाचा पुरवठादेखील मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून आले. इतर राज्यांतून नाशिकमध्ये अनेक प्रकारची औषधे येतात. कोेराेनाच्या काळात असलेल्या अनेक निर्बंधांमुळे औषधांचे खात्रीपूर्वक वितरण केवळ पोस्टाच्या माध्यमातून होत असल्याचे दिसून आले. विशेषत: आयुर्वेदिक, होमिओपॅथीच्या औषधांची मोठी आवक शहरात होत असल्याचेही यावरून दिसून आले.
--कोट--
नागरिकांना टपाल खात्यावर असलेल्या विश्वासामुळे कोरोनाच्या काळातही मोठ्या प्रमाणात टपाल तसेच साहित्यांचा बटवडा करण्यात आला. एस.टी.ची सेवा बंद असताना या सेवेत कोणताही खंड पडू न देता टपाल खात्याच्या गाड्या गावागावात पोहोचत आहेत.
- संदेश बैरागी, पोस्ट मास्तर, मुख्य टपाल कार्यालय
140921\515114nsk_32_14092021_13.jpg
पोस्ट व्हॅन