‘त्या’ पाहुण्याला निरोप देताना सारेच भावुक
By admin | Published: September 28, 2016 12:47 AM2016-09-28T00:47:00+5:302016-09-28T00:48:12+5:30
मुक्काम हलला : वनविभागाने घेतले वानराला ताब्यात
नरेंद्र दंडगव्हाळ सिडको
गेल्या महिनाभरापासून पवननगर परिसरात वास्तव्यास असलेल्या एका वानरास वनविभागाने ताब्यात घेतले. गेल्या तीस दिवसांचा वानराचा मुक्काम या भागातील शाळेच्या आवारात असलेल्या वृक्षांवर होता. सुरक्षित अधिवास, विक्रेत्यांकडून दररोज मिळणारे फळांच्या स्वरूपातील नैसर्गिक खाद्य आणि सुरक्षित वातावरण यामुळे केबीएच विद्यालयाचा परिसर या वानराच्या पसंतीचा झाला होता. वानराचा लळा लागलेल्या काही विद्यार्थ्यांना तर या घटनेनंतर रडू कोसळले.
सिडकोतील पवननगर येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालयाच्या आवारात गेल्या महिनाभरापासून एका वानराने ठाण मांडले होते. ही शाळा सकाळ व दुपार अशा दोन सत्रात भरते. दोन सत्र मिळून सुमारे पंधराशेपेक्षा अधिक विद्यार्थी याठिकाणी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या भोवतालच्या परिसरात नागरी वस्ती असून शाळेच्या आवारातच सकाळ व सायंकाळी हातगाडीवर विविध फळे तसेच खाद्यपदार्थ विक्रेते या ठिकाणी येतात.
या वानरामुळे परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांबरोबरच शाळेतील विद्यार्थ्यांचे मनोरंज होत होते. त्याला दररोज विद्यार्थ्यांकडून डब्यातील खाऊ मिळत असे. तसेच शाळेच्या आवारात विक्री करणाऱ्या हातगाड्यांवरील केळी, सफरचंद तसेच इतर खाद्यदेखील मिळत असल्याने वानरानेही येथेच राहणे पसंत केले होते. परंतु शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळेचे मुख्यध्यापक डी. के. खेडकर, उपमुख्याध्यापक आर. पी. नवसारे, पर्यवेक्षक एस. आर. सोनवणे, कलाशिक्षक संजय जगताप यांनी वनविभागास कळविले. यानंतर गेल्या सोमवारी वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार, वनपरीमंडल अधिकारी रवींद्र सोनार, शरद थोरात आदिंनी बचाव कार्य राबवित वानराला ताब्यात घेतले.
भोंग्याच्या आवाजाची आवड
गेल्या महिनाभरापासून शाळेतील विद्यार्थ्यांचे तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांचे मनोरंजन करणाऱ्या वानराला वनविभागाने ताब्यात घेतले. तेव्हा त्याच्या अनेक आठवणींना उजाळा विद्यार्थ्यांनी दिला. शाळेच्या आवारात असताना शाळेतील विद्यार्थ्यांना सूचना देण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या भोंग्याचा लळा हा या वानराला लागला होता. हे वानर सूचना देण्याच्या वेळी बरोबर या भोंग्याजवळ येऊन बसत असे. सकाळ आणि दुपारच्या सत्रात वेळोवेळी वाजणाऱ्या भोंग्याजवळ जाऊन बसत असत. कित्येकदा तर भोंग्याजवळ वानर गेल्याचे पाहून आता भोंग्यावरून सूचना येणार, अशीही चर्चा होत असे.