रुग्णसेवेच्या आड मद्यसेवेचा घाट !
By admin | Published: February 20, 2017 12:10 AM2017-02-20T00:10:08+5:302017-02-20T00:10:21+5:30
पोलिसांची करडी नजर : जिल्ह्यात धावताहेत ७१७ रुग्णवाहिका; पाण्याचे टँकरही रडारवर
विजय मोरे : नाशिक
रस्ते अपघातातील गंभीर जखमी असो की हृदयविकाराचा झटका आलेला असो या सर्वांसाठी जीवदान ठरते ती रुग्णवाहिका अर्थात अॅम्ब्युलन्स़ रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी २४ तास धावणाऱ्या या रुग्णवाहिकेचा सायरन ऐकल्यानंतर वाहनधारक तत्काळ आपली वाहने बाजूला घेऊन रस्ता करून देतात़ मात्र रुग्णसेवेचे तसेच लाखोंचे काम करणाऱ्या या रुग्णवाहिकांचा निवडणुकीच्या कालावधीत अवैध कामासाठी वापर केला जात असल्याचे वास्तव इंदिरानगरमधील घटनेनंतर समोर आले आहे़ त्यामुळे पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागास रुग्णवाहिका तसेच पाण्याचे टँकर यावर आपले लक्ष्य केंद्रित करावे लागणार आहे़ रुग्णांचा जीव वाचविण्याचे पवित्र कार्य करणाऱ्या रुग्णवाहिकांकडे बघण्याचा केवळ नागरिकांचा नव्हे तर पोलीस खात्याचा दृष्टिकोनही चांगला आहे़ सायरन वाजवत जाणारी रुग्णवाहिका गंभीर रुग्णाला दवाखान्यात घेऊन जात असावी अन्यथा अपघातस्थळी जात असावी असा नागरिकांचा समज बहुतांशी खराही असतो़ मात्र नागरिकांचा हा गैरसमज असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी (दि़१७) सकाळी इंदिरानगर बोगद्याजवळ रुग्णवाहिकेमधून दोन लाखांचा मद्यसाठा जप्त करून सिद्ध केले़ रुग्णवाहिकेकडे बघण्याच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे अनेक सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती या वाहनांसाठी निधी देतात़ तसेच पोलीस तसेच सरकारी यंत्रणा याकडे दुर्लक्ष करतात, याचाच गैरफायदा घेऊन सामाजिक निधीतून मिळालेल्या या रुग्णवहिकेमधून मद्याची सर्रास वाहतूक केली जात होती़ विशेष म्हणजे महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला दीव-दमण येथील ८९ हजार रुपयांच्या या मद्याची महाराष्ट्रात दोन लाख रुपये किंमत आहे़ महापालिका निवडणुकीच्या कालावधीत हा मद्यसाठा नेला जात असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात असून, अनेक दिवसांपासून हा उद्योग सुरू असल्याचे समोर आले आहे़ त्यामध्ये रुग्णवाहिका तसेच पाण्याच्या टँकरमधून अवैध मद्याची वाहतूक तसेच मतदारांना वाटण्यासाठी पैसे पाठविल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे येत्या काही दिवसांत पोलिसांना रुग्णवाहिका व पाण्याच्या टँकरची विशेष तपासणी करावी लागणार आहे़ (प्रतिनिधी)