पांढुर्ली-भगूर रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 10:55 PM2020-01-20T22:55:46+5:302020-01-21T00:17:08+5:30
सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली-भगूर रस्त्यावरून प्रवास करताना रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांसह प्रवाशांनी केली आहे.
विंचूर दळवी : सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली-भगूर रस्त्यावरून प्रवास करताना रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांसह प्रवाशांनी केली आहे.
पांढुर्ली-भगूर रस्त्याला मधोमध मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. रस्त्यावरील डांबर नाहीसे होऊन खडी उघडी पडली आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहणे चालविताना कसरत करावी लागत आहे. छोटे-मोठे अपघात नेहमीच घडत असतात. रात्री-अपरात्री मोठा अपघात झाला तर याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिक करत आहेत.
मागील महिन्यात संबंधित ठेकेदाराने खड्डे बुजविण्याचे काम केले. परंतु तेही निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. रस्त्याच्या कडेला खडी अस्ताव्यस्त पडलेली दिसत आहे. त्यामुळे वाहन चालवणे जिकिरीचे झाले आहे. एखाद्याचा प्राण गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का, असा सवाल वाहनधारकांसह नागरिकांनी उपस्थित केला आहे.
लोकप्रतिनिधींनी गांभीर्य लक्षात घेऊन रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.
या रस्त्याने नेहमीच हलक्या व अवजड वजनाची ये-जा सुरू असते. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने व सायकलवरून शाळेत जाणारे विद्यार्थी याच मार्गाने जातात. खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून, त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.