रेशीमगाठी जुळविण्यात व्हॉट्स अॅपचे योगदान
By admin | Published: April 24, 2017 02:06 AM2017-04-24T02:06:01+5:302017-04-24T02:06:15+5:30
लग्न जुळविण्यासाठी पूर्वापार चालत आलेली साधने आता मागे पडत चालली असून, व्हॉट््स अॅप, फेसबुक आदि सोशल मीडियाची मदत घेतली जात आहे
भाग्यश्री मुळे नाशिक
लग्न जुळविण्यासाठी पूर्वापार चालत आलेली साधने आता मागे पडत चालली असून, व्हॉट््स अॅप, फेसबुक आदि सोशल मीडियाची मदत घेतली जात आहे. व्हॉट््स अॅप ग्रुपद्वारे लग्न जुळविण्याचा फंडा सध्या आघाडीवर असल्याचे दिसून येत असून, त्यामुळे लग्न जमविणे सोपे झाल्याचा सूर विवाहेच्छुकांकडून व्यक्त होत आहे.पूर्वी ओळखीच्या नातेवाइकांकडे शब्द टाकला की इच्छुक वधू-वरांची स्थळे समजायची. पत्रिका जुळली की पाहण्याचा कार्यक्रम, पसंती झाली की बैठक आणि साखरपुडा, लग्नाची निश्चिती या गोष्टी लगोलग होत असत. आता मात्र वधू-वर आणि त्यांच्या पालकांच्या वाढत्या अपेक्षा आणि बदललेली सामाजिक परिस्थिती बघता लग्न जमविणे हे अवघड काम होऊन बसले आहे. त्यामुळे प्रत्येक समाजाच्या वतीने मुखपत्राच्या मदतीने प्रसिद्ध होणारी स्थळांची माहिती, त्यानंतर स्थळांसंबंधीचा होणारा पत्रव्यवहार, इमेलचा वापर वाढल्यानंतर मेलने होऊ लागला. त्यानंतर सकेतस्थळांची चलती वाढली. संकेतस्थळांवर स्थळांसंबंधी फोटोसह सविस्तर माहिती असल्याने लोकांना ते उपयुक्त वाटू लागले. मेल मागे पडले आणि त्याची जागा फेसबुक, व्हॉट््स अॅपने घेतली आहे. सध्या लग्न जुळविण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित व्हॉट््स अॅप ग्रुप कार्यरत आहेत. त्यात प्रत्येक जातीनुसार वेगवेगळे व्हॉट््स अॅप ग्रुप चालविले जात आहे. याशिवाय हुंडा घेणारे, न घेणारे, आंतरजातीय, आंतर धर्मीय लग्न करण्यास तयार असणाऱ्यांचे व्हॉट््स अॅप ग्रुप रेशीमगाठी जुळविण्यात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. हे व्हॉट््स अॅप ग्रुप मोफत सभासदत्व व माहिती देत आहेत. इच्छुक वधू-वरांचे फोटो, बायोडाटा, कौटुंबिक माहिती, छंद -आवडीनिवडी, अपेक्षा या साऱ्यांची माहिती संक्षिप्त आणि थेटपणे मिळत असल्याने वधू-वर व त्यांच्या पालकांना निर्णय घेणे सोपे जात आहे.४ग्रुपमध्ये सहभागी होणाऱ्यांना सुरुवातीला नियमावली सूचना स्वरूपात दिली जात असून, घ्यावयाची काळजी याबाबतही मार्गदर्शन केले जात आहे. सध्या देशभर जातीनुसार, समाजानुसार, वयानुसार, ३५ प्लस, ४० प्लस, एमपीयूपी (मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश), महाराष्ट्र प्लस एमपीयूपी असे असंख्य ग्रुप कार्यरत आहेत. ‘शुभविवाह’, ‘शुभबंधन’, ‘रेशीमगाठी’, ‘खान्देशविवाह’ अशा विविध नावांनी हे ग्रुप कार्यरत आहेत. ग्रुपवर दररोज स्थळांचे विविध पर्याय, सविस्तर माहिती, फोटो, अपेक्षा या साऱ्या गोष्टी येत असतात, पण त्याचबरोबर ग्रुपच्या माध्यमातून लग्न जुळल्यास त्याची बातमी, साखरपुड्याचा फोटो अशा गोष्टीही शेअर केल्या जात आहे.