पटकू शकणारा उमेदवार कोण?
By किरण अग्रवाल | Published: January 12, 2019 11:06 PM2019-01-12T23:06:12+5:302019-01-13T01:46:35+5:30
लोकसभा निवडणुकीचे घोडामैदान जवळ आले आहे. ‘युती’ची अनिश्चितताही दिवसेंदिवस वाढत असून, ‘पटक देंगे’च्या भाषेमुळे संबंध अधिकच ताणले गेले आहेत. पण समोरच्यांना पटकायचे तर तसा उमेदवार व प्राथमिक तयारीही हवी. स्थानिक पातळीवर भाजपात ती दिसत नाही. अन्यपक्षीय संभाव्य उमेदवार कामालाही लागले असताना भाजपात सारीच अनिश्चिततेची स्थिती आहे. म्हणूनच प्रश्न उपस्थित होतो की, पटकणार कसे?
सारांश
युती झाली नाही तर शिवसेनेलाही ‘पटक देंगे’ची भाषा भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी केली असली तरी, शिवसेना असो की काँग्रेस आघाडी, प्रतिस्पर्धींना खरेच पटकू शकणारे स्वबळाचे उमेदवार सर्वच ठिकाणी भाजपाकडे असल्याचे दिसत नाही. नाशकातही तीच स्थिती आहे. म्हणायला नावे अनेक चर्चिली जात आहेत; पण समोरच्या जवळपास निश्चित मानल्या जाणाऱ्या नावांच्या तुलनेत भाजपाच्या संभाव्य उमेदवारांची तयारी फारशी आढळत नाही. त्यामुळेच ऐनवेळचा उमेदवार समोरच्याला पटकू शकेल का, याबाबत चर्चा घडून येणे क्रमप्राप्त ठरून गेले आहे.
शिवसेना-भाजपाची ‘युती’ घडून येईल असे म्हणता म्हणता उभयतांतील दरी दिवसेंदिवस रुंदावत चालली आहे. त्यात अलीकडील भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या ‘पटक देंगे’ विधानाने भरच पडली आहे. कारण, हे साधे-सरळ विधान नाही; सोबत न आल्यास एकप्रकारे पाहून घेण्याचीच ती धमकी आहे. त्यामुळे शिवसेना नेते आणखीनच इरेला पेटल्यासारखी विधाने करीत आहेत. परिणामी काडीमोड गृहीत धरला जात आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनिमित्त पालकमंत्री गिरीश महाजन नाशकात आले असता त्यांनीही याबाबत स्पष्टता केली आहे. ‘युतीसाठी शिवसेनेचा हात धरून ओढणार नाही, आपल्या पक्षाची निवडणुकीसाठीची तयारी पूर्ण झाली आहे’, असे महाजन यांनी सांगितले; पण तयारी झाली म्हणजे कसली? पक्षाचा एकमुखी उमेदवार म्हणता यावा असे एकही नाव समोर नसताना पक्षाध्यक्षांचा ‘पटक देंगे’चा विश्वास सार्थ ठरवायचा तर ते जामनेर नगरपालिकेचे मैदान मारण्याएवढे सहज-सोपे थोडे आहे?
लोकसभा मतदारसंघाचा आवाका मोठा असल्याने त्यासाठी कोणत्याही पक्षाला व त्याच्या संभाव्य उमेदवाराला प्रत्यक्ष निवडणुकीच्या व आचारसंहिता लागू होण्याच्या पूर्वीपासूनच राजकीय मशागत करावी लागते. त्यात नाशिक लोकसभा मतदारसंघातील ६ पैकी ३ विधानसभा मतदारसंघ भाजपेतर पक्षांकडे आहेत. यात नाशिकरोड-देवळाली, सिन्नर व इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना व काँग्रेसचे प्राबल्य पाहता तिथे भाजपाला अधिक मेहनत घ्यावी लागेल; परंतु ‘युती’ची अनिश्चितता असल्याने व ती न झाल्यास उमेदवारीच्या निश्चितीचीही शाश्वती नसल्याने आज घडीला कोणीही पुढे होऊन काही करताना दिसत नाही. ‘युती’ फिसकटलीच व पक्षाने सांगितले तर लढून घेऊ, अशा मानसिकतेने संभाव्य उमेदवारांचा वावर सुरू आहे. लढायचेच म्हणून स्वबळाने लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणारे नाव भाजपात कुणाकडूनही पुढे केले जात नाही. ‘हे’ही असू शकतात, त्यांचीही चर्चा आहे, असेच सारे सुरू आहे. त्यामुळे कुणाच्याही नावाचा ऐनवेळी विचार झाला तर त्यातून त्यांची धावपळ उडणे क्रमप्राप्त ठरेल.
तुलनेत समोरच्या पक्षांमधील उमेदवारांची नावे जवळपास निश्चित असल्यासारखी आहेत, म्हणून भाजपातील अनिश्चिती चर्चेला निमंत्रण देणारी ठरली आहे. ‘युती’ होवो अगर न होवो, शिवसेनेच्या उमेदवारीबाबत कुणी शंका घेताना दिसत नाही. त्याखेरीज काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचा निर्णय झाला असून, त्या महाआघाडीची उमेदवारीही काकांना की पुतण्याला, एवढाच निर्णय बाकी असल्यासारखे आहे. नावे घ्यायला त्या त्या पक्षांतही अनेकांची नावे चघळली जातात; परंतु एकेका जागेसाठी प्रत्येकच पक्षांकडून कसली जात असलेली कंबर पाहता; धोका पत्करायची कुणाचीही तयारी नाही. पक्षाच्या पाठबळाखेरीज उमेदवाराचे स्वबळ व ‘इलेक्टिव्ह मेरिट’मध्ये गणल्या जाणाºया सर्व बाबींची पूर्तता करू शकणाºयासच कोणताही पक्ष रिंगणात उतरवेल. त्यादृष्टीने शिवसेना, राष्ट्रवादीतील नावे निश्चित असल्यासारखी असून, संबंधितांनी वैयक्तिक पातळीवर आपापली तयारी सुरू करून दिल्याचेही प्रकर्षाने दिसून येत आहे. पक्षांतर्गत उपक्रम व सार्वजनिक कार्यक्रमांमधील संबंधितांचा वावर यातून तर ते जाणवतेच, शिवाय, व्यूहरचनेची त्यांनी चालविलेली तयारीही त्याबाबतचा संकेत देऊन जाते.
या पार्श्वभूमीवर, अगोदरपासूनच कामास लागलेल्या अन्य पक्षीय उमेदवारांशी टक्कर घ्यायची व त्यांना पटकून द्यायचे ध्येय गाठायचे तर त्यासाठी पूर्व तयारीही हवीच. बरे, आता पूर्वीसारखी म्हणजे गेल्या खेपेसारखी स्थिती राहिलेली नाही हेही एव्हाना स्पष्ट झाले आहे. मोदी यांनी येऊन ‘मित्रो, भाईयो और बहनो...!’ म्हटले म्हणजे झाले, असे होणार नाही. या मर्यादा भाजपादेखील जाणून आहे. म्हणूनच तर शिवसेना तुटेस्तोवर ताणत असतानाही भाजपा आशावादी राहून सारे सहन करीत आहे. तेव्हा, प्रश्न इतकाच की; खरेच पटकून देण्याच्या इराद्याने लढायची वेळ आली तर भाजपाचा असा पटकू शकणारा उमेदवार कोण?