परधाडी शाळेला ‘कोणी शिक्षक देता का...शिक्षक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 03:16 PM2020-01-03T15:16:33+5:302020-01-03T15:17:01+5:30
न्यायडोंगरी : नांदगाव तालुक्यातील परधाडी येथील इंदिरानगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या दोन वर्षांपासून पहिली ते चौथी पर्यंतच्या वर्गाला एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पालकांनी ‘‘कोणी शिक्षक देता का...शिक्षक’ असा टाहो फोडला आहे.
पालकांचा टाहो : चार वर्गांचा भार एकट्यावर, विद्यार्थ्यांची परवड
न्यायडोंगरी : नांदगाव तालुक्यातील परधाडी येथील इंदिरानगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या दोन वर्षांपासून पहिली ते चौथी पर्यंतच्या वर्गाला एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पालकांनी ‘‘कोणी शिक्षक देता का...शिक्षक’ असा टाहो फोडला आहे. शाळा रंगकाम करून दिसायला सुंदर , डिजिटल , मुलांना शिकविण्यासाठी संगणक , एल.इ.डी. टी. व्ही. सर्व काही असतानाही मात्र शिक्षकाशिवाय या सर्व सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. गावातील सरपंच व शाळा व्यवस्थापक कमिटीच्या वारंवार मागणीला ही गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखवत असल्याने तालुक्यातील शिक्षण विभाग परधाडी गावातील इंदिरा नगर भागात असलेल्या या प्राथमिक शाळेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष का ? असा प्रश्न येथील पालकांनी उपस्थित केला आहे.
पहिले ते चौथीचे सर्व विद्यार्थी एकत्र एकाच वर्गात बसवून शिकवत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. एकमेव असलेल्या शिक्षकावर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाारोबरच हाच शिक्षक प्रशासकीय माहितीची कामे , पोषण आहार , मूल्यमापन रेकॉर्ड , बिटस्तरीय व तालुकास्तरीय मिटिंगच्या दिवशी विद्यार्थीच बनतात शिक्षक अन शाळा चालवतात. एवढंच नव्हेतर शिक्षक व्यक्तिगत रजेवर गेला तर शाळेला पण सुट्टी देण्याची नामुष्की या शाळेवर गेल्या दोन वर्षांपासून येताना दिसत आहे.
येथील ग्रामपंचायत सदस्य रामदास पवार , शाळा व्यवस्थापक अध्यक्ष वाल्मिक चव्हाण , शिवाजी जाधव यांनी अनेक वेळा पाठपुरावा करूनही या शाळेला शिक्षक मिळत नसल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या काळात अजून शिक्षक न मिळाल्यास सामुदायिक दाखले काढून घेऊन शाळेला कुलूप लावण्याचा इशारा शाळा व्यस्थापक अध्यक्ष वाल्मिक चव्हाण यांनी दिला आहे.