कळवणच्या मेन रोडला वाली कोण...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 10:29 PM2021-08-05T22:29:29+5:302021-08-05T22:30:07+5:30
कळवण : ह्यसरकारी काम अन् बारा महिने थांबह्ण या म्हणीची प्रचिती देणाऱ्या आणि चौदा महिन्यांपासून रडतखडत संथ गतीने सुरू असलेल्या कळवण शहरातील मेन रोडवर रिमझिम पावसामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांत पाणी साचून खड्ड्यांचे डबक्यात रूपांतर झाले आहे. त्यामुळे नागरिकांना पायी चालणे मुश्किल, तर वाहनधारकांना वाहन चालवणे कठीण झाले आहे.
मनोज देवरे
कळवण : ह्यसरकारी काम अन् बारा महिने थांबह्ण या म्हणीची प्रचिती देणाऱ्या आणि चौदा महिन्यांपासून रडतखडत संथ गतीने सुरू असलेल्या कळवण शहरातील मेन रोडवर रिमझिम पावसामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांत पाणी साचून खड्ड्यांचे डबक्यात रूपांतर झाले आहे. त्यामुळे नागरिकांना पायी चालणे मुश्किल, तर वाहनधारकांना वाहन चालवणे कठीण झाले आहे.
रस्त्यावर चिकन माती टाकत असल्यामुळे पाऊस पडल्याने चिखल होऊन बसस्थानकाजवळ गाडी स्लिप होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे रस्त्यावरुन जाणारे मोटारसायकल चालक अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहत आहे. त्यामुळे हे काम पूर्ण कधी होणार आणि कळवणचा मेन रोड मोकळा श्वास कधी घेणार हा प्रश्नच असून कामाच्या संथ गती बद्दल नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
यंत्रणा सुस्त, नागरिक त्रस्त...
एक ते दीड वर्षापासून येथील मेन रोडचे काम संथ गतीने सुरू आहे. अद्याप पन्नास टक्के कामही पूर्ण झालेले नाही. रस्त्याच्या कामामुळे एका बाजूला ठिकठिकाणी खड्डे खोदण्यात आले असून, त्यातील माती दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर पसरली आहे. दुसऱ्या बाजूला असलेल्या आधीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे मातीचा चिखल झाला असून, मेन रोडवर सर्वत्र चिखल साचला आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खड्ड्यांचे रूपांतर डबक्यात झाले आहे. रस्त्यावरून वाहने जात असताना खड्ड्यांमधील पाणी पादचारी आणि दुचाकीस्वारांच्या अंगावर उडत असल्याने वाद होत आहेत. बसस्थानकाजवळील पूल ते मराठी मुलांच्या शाळेपर्यंत सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. डॉ. न्याती चौक, बसस्थानक परिसरात चिखलाचा गाळ झाल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. आधीच रस्त्याची एकच बाजू वापरासाठी सुरू असल्याने आणि त्यात आता पावसामुळे चिखलाची भर पडल्याने नागरिक त्रस्त झाले असून, मेन रोडचे काम पूर्ण होणार तरी कधी, असा प्रश्न पडला आहे.
कामाकडे ह्यअर्थह्णपूर्ण दुर्लक्ष..?
कळवण मेन रोडच्या कामाला वर्षभरापासून गती मिळालेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा या कामावर अंकुश नसल्याचे चित्र आहे. तर या कामाकडे ह्यअर्थह्णपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. या कामावर कोणताही अधिकारी उपस्थित राहत नाही, मजुरांच्या भरवशावर काम सुरु असलेल्या मेन रोडच्या कामाचे कवित्व वर्षभरापासून सुरू असल्याने यंत्रणा सुस्तावली असली तरी नागरिक मात्र त्रस्त आहेत. मेन रोडवर सर्वत्र चिखल झाल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच पादचाऱ्यांचे हाल होत आहेत. वाहन चालकांनाही कसरत करावी लागत असल्याने संबंधितांनी काम त्वरित पूर्ण करण्याची गरज आहे.
कळवणच्या मेन रोडला वाली कोण...?
चौदा महिन्यांपासून संथ गतीने सुरू असलेले काम, ठिकठिकाणी करण्यात आलेले खोदकाम,रस्त्यावर पसरलेली माती आणि पावसाळा सुरू झाल्याने रस्त्यावर साचलेला चिखल, खड्ड्यांचे डबक्यात झालेले रूपांतर यामुळे कळवणच्या मेन रोडची प्रचंड दुर्दशा झाली असून संपूर्ण रस्ता चिखलात गेल्याने जनता त्रस्त तर काम करणारी आणि लक्ष ठेवणारी यंत्रणा सुस्त झाल्याने कळवणच्या मेन रोडला वाली कोण असा प्रश्न विचारण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
मेन रोड अस्वच्छतेच्या गर्तेत
मेन रोडवर सर्वत्र दुतर्फा खोदकाम केले जात असून या खोदकामामुळे वाहतूक एकेरी केली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न शहरात निर्माण होत आहे. गेल्या आठवडाभरापासून शहर परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचे रूपांतर पाण्याच्या डबक्यात झाले असून पाणी साचून राहत असल्याने मेनरोड अस्वच्छतेच्या गर्तेत सापडला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग बघ्याच्या भूमिकेत
मेन रोडच्या कामाला सुरुवात होऊन चौदा महिने लोटले असून कामाची गती आश्चर्यजनक आहे. इतका कालावधी उलटूनही काम २५ टक्केही पूर्ण झालेले नसल्याने यंदाच्या पावसाळ्यातही मेन रोड चिखलातच आहे. सुस्तावलेली यंत्रणा कामाला गती कधी देणार हा प्रश्नच असून सार्वजनिक बांधकाम विभागाने बघ्याची भूमिका सोडून काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.