चुरशीच्या लढतीत मतविभागणीचा लाभ कुणाला?

By admin | Published: February 16, 2017 01:26 AM2017-02-16T01:26:45+5:302017-02-16T01:28:03+5:30

चुरशीच्या लढतीत मतविभागणीचा लाभ कुणाला?

Who has the advantage of voting in the competition? | चुरशीच्या लढतीत मतविभागणीचा लाभ कुणाला?

चुरशीच्या लढतीत मतविभागणीचा लाभ कुणाला?

Next

 पंकज पाटील उपनगर
चार विद्यमान नगरसेवक आणि सहा माजी नगरसेवकांचे राजकीय भवितव्य उपनगर-टाकळी परिसरातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये ठरणार आहे. ताकदवार उमेदवार आमने-सामने आल्याने प्रभागात चुरशीचा सामना बघायला मिळणार असून, मतविभागणीचा लाभ नेमका कुणाला होतो, यावर सारे विजयाचे समीकरण अवलंबून असणार आहे.
नव्याने झालेल्या प्रभागरचनेत विस्तारलेला प्रभाग क्रमांक १६ यावेळी राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारी करणाऱ्यांसाठी दमछाक करणारा ठरत आहे. महापालिका निवडणुकीत अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून मनसेच्या विद्यमान नगरसेवक मेघा साळवे यांच्यासमोर भाजपाच्या माजी नगरसेवक उज्ज्वला हिरे यांचे मुख्यत्वे आव्हान असले तरी राष्ट्रवादीच्या सुषमा रवि पगारे यांच्या उमेदवारीने या गटातील लढत रंगतदार होणार आहे. सुषमा पगारे यांनी गेल्यावेळी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. शिवसेनेने तिकीट नाकारल्याने त्यांना राष्ट्रवादीने चाल दिली आहे. याच गटात शिवसेनेचे विभागप्रमुख आशिष साबळे यांच्या पत्नी विद्या साबळे रिंगणात आहेत. याशिवाय, बसपाच्या अरुणा उघाडे व अपक्ष माधुरी भोळे, कोमल साळवे हे उमेदवार आहेत. अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातून शिवसेनेकडून विद्यमान नगरसेवक नंदिनी जाधव रिंगणात आहेत. यापूर्वी, सातपूर भागातून माकपाकडून निवडून गेलेल्या नंदिनी जाधव यांनी नंतर पक्षांतर करत सेनेत प्रवेश केला होता. याच गटात भाजपाकडून रूपाली थविल, कॉँग्रेसकडून आशा रफीक तडवी, मनसेकडून हेमलता कडाळे, बसपाकडून अनुजा धराडे तसेच पाच अपक्ष उमेदवार आहेत. त्यात माजी नगरसेवक सविता गायकवाड यांचा समावेश आहे. जाधव यांना थविल, तडवी यांचे आव्हान असेल. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून भाजपाकडून माजी नगरसेवक अनिल ताजनपुरे, सेनेकडून सुनील जाधव, राष्ट्रवादीकडून ज्योती जोंधळे, मनसेकडून नीलेश सहाणे, बसपाकडून सविता केदारे यांच्यासह दोन अपक्ष उमेदवार आहेत. कॉँग्रेसच्या बंडखोर उमेदवार व माजी नगरसेवक वंदना मनचंदा या अपक्ष उमेदवारी करत आहेत. या गटात भाजपा व राष्ट्रवादीत लढत शक्य आहे. सर्वसाधारण गटात चुरशीचा सामना होत आहे. या गटात माजी महापौर अशोक दिवे यांचे सुपुत्र व नगरसेवक राहुल दिवे, भाजपाचे नगरसेवक प्रा. कुणाल वाघ, शिवसेनेकडून माजी नगरसेवक विजय ओहोळ, अपक्ष म्हणून माजी नगरसेवक रमेश जाधव, बसपाकडून प्रमोद भालेराव यांच्यासह दोन अपक्ष उमेदवार आहेत. या गटात तिरंगी लढत होत आहे. चारही गटात ताकदवार उमेदवार असल्याने आणि प्रादेशिकतेचाही मुद्दा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने मतविभागणीचा नेमका लाभ कुणाला होतो, याकडे लक्ष लागून असणार आहे.

Web Title: Who has the advantage of voting in the competition?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.