देव तारी त्याला कोण मारी : प्लॅस्टिकच्या गोणीत गुंडाळून अवघ्या साडेतीन तासांच्या चिमुकलीला फेकले जंगलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:24 PM2021-02-06T17:24:29+5:302021-02-06T17:30:17+5:30
डॉक्टरांनी बाळाची तपासणी करत प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले. बाळाचे वजन दोन किलो ७०० ग्रॅम असून बाळाला आवश्यक ते डोसदेखील पाजण्यात आले.
नाशिक : या जगात येऊन अवघे साडेतीन तास होत नाही तोच एका चिमुकल्या गोंडस अशा नवजात शिशुला प्लॅस्टिकच्या गोणीत गुंडाळून अज्ञात जन्मदात्यांनी बेवारसपणे शिवाजीनगर येथील फाशीच्या डोंगराच्या पायथ्याला फेकून देत पोबारा केला; मात्र 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीनुसार या 'नकोशी'ला जीवदान लाभले आणि जागरुक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी या शिशुला श्रमिकनगर रुग्रालयात उपचारार्थ दाखल केले.
याबाबत अधिक माहिती अशी, रविंद्र रामचंद्र पवार हे नेहमीप्रमाणे सकाळी पाळीव श्वानासोबत फेरफटका मारत होते. यावेळी बाळाच्या रडण्याचा आवाज अचानकपणे त्यांच्या कानी पडला आणि पवार यांची पावले जागीच थबकली. जंगलाच्या निर्जन परिसरात नेमके बाळ रडतेय कोठे? म्हणून त्यांनी आजुबाजुला नजर टाकून धुंदाळण्याचा प्रयत्न केला असता एका प्लॅस्टिकच्या गोणीत कापडामध्ये गुंडाळलेले बाळ त्यांच्या नजरेस पडले. त्यांनी त्वरित बाळाला गोणीतून बाहेर काढत प्राणवायु सहज मिळेल अशी तजवीज केली आणि मदतीसाठी जवळच्या एका मित्राशी संपर्क साधला. या नवजात शिशुला उपचारासाठी त्वरित या दोघांनी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी बाळाची तपासणी करत प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले. बाळाचे वजन दोन किलो ७०० ग्रॅम असून बाळाला आवश्यक ते डोसदेखील पाजण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी रुग्णालयात धाव घेतली. मोरे यांनी या चिमुकलीचे नाव शंकुतला असे ठेवले आहे. या चिमुकलीला जन्म देणाऱ्या 'वैरिणी' मातेविरुध्द गंगापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे.