‘जो जिता वही सिकंदर’

By admin | Published: August 30, 2016 01:57 AM2016-08-30T01:57:52+5:302016-08-30T01:59:43+5:30

नाशिकरोडमधील भाजपाच्या विजयाने बदलली राजकीय समीकरणे; निकालाने सर्वच थक्क

'Who lives the same Sikandar' | ‘जो जिता वही सिकंदर’

‘जो जिता वही सिकंदर’

Next

 मनोज मालपाणी, नाशिकरोड :
शिवसेनेचा बालेकिल्ला व राष्ट्रवादीचे दिग्गज नेते असलेल्या नाशिकरोडमध्ये भाजपाचे दोन्ही नगरसेवक निवडून आल्याने केवळ प्राबल्य असे बिरूद मिरविणाऱ्या या पक्षांना भाजपाने ‘जो जिता वही सिकंदर’ असेच दाखवून दिले. इतकेच नव्हे तर शिवसेनेला त्यांच्याच भाषेत व त्यांच्याच स्टाइलने उत्तर मिळाल्याने सेनेसाठीदेखील ही धोक्याची घंटा मानली जात आहे. भाजपाच्या विजयाने पारंपरिक मतदान फिरल्याने मतदारांना गृहित धरण्याचे दिवस आता संपले हेच जणू मतदारांनीही दाखवून दिले.
केवळ चार महिन्यांसाठी होत असलेली पोटनिवडणूक सुरुवातीला कोणत्याही पक्ष व पदाधिकाऱ्यांना नको होती. शिवसेना-भाजपामध्ये युती व्हावी, असे दोन्ही पक्ष व पदाधिकाऱ्यांना पहिल्यापासून वाटत नसल्याने दोघांची ‘एकला चलो’ अशी भूमिका होती. तर मनसे स्वबळावर व कॉँग्रेस-राष्ट्रवादी आणि इतर मित्रपक्षांना प्राप्त परिस्थितीनुसार आघाडी करण्याशिवाय पर्याय नव्हता. शिवसेना-भाजपाकडे उमेदवारांची भाऊगर्दी होती, तर सत्ता असूनही खडतर प्रवास करणाऱ्या मनसेला उमेदवारीसाठी शोधाशोध करावी लागली नाही. तर कॉँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षाने आघाडी केल्यामुळे प्रभाग ३६ कॉँग्रेसने पीपल्स रिपाइंचे शशिकांत उन्हवणे यांना उमेदवारी दिली. तर ‘व्हॅन्टीलेटर’वर असल्यासारखी गत झालेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसने ऐनवेळी वंदना चाळीसगावकर यांना निवडणूक रिंगणात उतरविले. शिवसेनेने सर्व बाबींचा विचार करून उमेदवारी निश्चित केली. तर भाजपाने जशास तसे उत्तर देण्याची व प्रस्थ निर्माण करण्याचे धोरण आखत उमेदवारी बहाल केली.
भाजपाने अपक्ष नगरसेवक पवन पवार याला पक्षात प्रवेश दिल्याने राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आणि तेथूनच निवडणुकीची चूरस निर्माण झाली. ‘गुंडगिरी’च्या नावावर प्रचार रंगू लागला. पहिल्यापासूनच खरी स्पर्धा भाजपा-शिवसेना यांच्यातच लागल्याने दोघांनी विजयासाठी जिवाचे रान करण्यास सुरुवात केली होती. प्रभाग ३५ मध्ये राष्ट्रवादीच्या चाळीसगावकर यांची उमेदवारी ही पहिल्यापासूनच नावापुरती दिसत होती, तर मनसेच्या शेजवळ यांच्या एका परिसरात चांगलीच ‘चलती’ असल्याने त्या भरवशावर मनसे चालत होती. मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावरून चालविलेला प्रचार ‘सोंग’ ठरून गेले. तर भाजपाने पवन पवार यांच्या पक्षप्रवेशामुळे कितीही आरोप झाले तरी शिवसेनेला त्यांच्याच स्टाइलने उत्तर देण्यासाठी व्यूहरचना आखली होती. या सर्व राजकारणाचा परिणाम मात्र मतदारांवर झालेला दिसला नाही. मात्र पैशांचा झालेला वापर, दादागिरी, गुंडगिरी यांचादेखील चांगलाच बोलबाला होता. साम-दाम-दंड भेद यात भाजपा शिवसेनेला सरस ठरली हेही नाकारता येणारे नाही.
भाजपाच्या सुनंदा मोरे व कॉँग्रेसचे शशिकांत उन्हवणे यांची पूर्ण मदार
कॅनॉलरोड झोपडपट्टी व भीमनगर परिसरावर होती. तर शिवसेना, मनसेने झोपडपट्टी परिसर
वगळता इतर भागावर लक्ष केंद्रित केले होते. काही ठिकाणी उमेदवारांना यश आले तर
काही ठिकाणी अपयश मात्र मते खेचून घेण्याचे गणित विचारात घेतले तर भाजपाला
त्याचे क्रेडिट द्यावे लागेल. निवडणुकीत
विजय मिळविणे हेच अंतिम सत्य असते
आणि तेच भाजपाने दाखवून दिले. शेवटी
‘जो जिता वही सिकंदर’!

Web Title: 'Who lives the same Sikandar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.