महापौर महाशिवआघाडीचा? नाशिकच्या 'मनसे' नेत्यांची 'राज दरबारी' खलबतं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 12:50 PM2019-11-17T12:50:01+5:302019-11-17T12:50:48+5:30
सध्या नाशिक महापालिकेत मनसेचे अवघे 5 नगरसेवक आहेत. 65 नगरसेवकांसह भाजपचे पूर्ण बहुमत आहे.
नाशिक - नाशिकच्यामहापौरपदाबाबत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी खलबते सुरू झाली असून राज नाशिकच्या बाबतीत काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. मनसेचे नेते डॉ प्रदीप पवार, माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी गटनेते सलीम शेख आणि जिल्हा प्रमुख अनंता सूर्यवंशी हे आज सकाळी नाशिकमधून राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईत रवाना झाले होते. आता ते राज यांच्या निवासस्थानी पोहोचले असून नाशिकच्या महापौर पदाबाबत खलबते सुरू झाल्याची माहिती आहे.
सध्या नाशिक महापालिकेत मनसेचे अवघे 5 नगरसेवक आहेत. 65 नगरसेवकांसह भाजपचे पूर्ण बहुमत आहे. मात्र, राज्याप्रमाणेच नाशिक मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, मनसे आणि अपक्ष एकत्र आले तर महाशिवआघाडी भाजपला आव्हान देऊ शकते. भाजपचे काही नाराज नगरसेवक फुटीच्या तयारीत असल्याचे सांगितले जात असून त्यामुळे विरोधकांचे मनोबल वाढले आहे. नाशिकमध्ये आज शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी बैठक होत असताना दुसरीकडे मात्र नाशिक मनसेचे पदाधिकारी राज दरबारी गेले आहेत.
नाशिक महापालिकेच्या 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेचे 40 नगरसेवक होते आणि पहिला महापौर म्हणून ऍड यतीन वाघ यांची त्यांनी भाजपच्या पाठिंब्यानेच निवड केली होती. तर, याच पंचवार्षिक मध्ये दुसऱ्या अडीच वर्षात नाशिक महापालिकेत भाजप आणि शिवसेना यांची युती झाली आणि मनसेला दूर ठेवण्यासाठी लढत देण्यात आली त्यावेळी मनसेला काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी साथ दिल्याने पुढील अडीच वर्षे मनसेचे अशोक मुर्तडक हे महापौर होऊ शकले होते. त्यामुळे राज यांना भाजप आणि विरोधकांनी सारखीच मदत केली असल्याने आता राज नक्की काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.