पोलिसांना कोण जुमानतं?
By admin | Published: August 19, 2014 12:24 AM2014-08-19T00:24:02+5:302014-08-19T01:22:27+5:30
गणेशमूर्ती गाळे : शांतता क्षेत्रात असूनही यंत्रणा मख्ख
नाशिक : एरव्ही रस्त्यालगत दुचाकी लावली तरी वाहतुकीला अडथळा आणला म्हणून सर्वसामान्य नागरिकांना दंड करणाऱ्या पोलीस यंत्रणेने शांतता क्षेत्रात गणेशमूर्ती गाळे उभारणी सुरू झाल्यानंतर मख्ख भूमिका घेतली आहे. इतकेच नव्हे, तर ज्या रस्त्यावर गाळे बांधले जात आहेत ती जागा पालिकेची असल्याची सोयिस्कर भूमिका घेत हातही झटकले आहेत. दुसरीकडे पालिकेचे नेहमीचे राजकारण असून, आजी-माजी नगरसेवकांचे कार्यकर्ते असलेल्या मूर्ती विक्रेत्यांसमोर पालिका प्रशासनाने सपशेल लोटांगण घातले आहे.
गणेशमूर्ती विक्रीचे गाळे थाटण्यास सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या भिंतीलगत गाळे उभारणीचा वाद पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात विक्रेत्यांनी महापौर यतिन वाघ आणि अतिक्रमण उपआयुक्त रोहिदास बहिरम यांची भेट घेतली. त्यावेळी महापौरांनी पोलिसांची परवानगी आल्यानंतर परवानगी देण्याचा विचार करू, असे सांगितले होते. परंतु त्याकडेही सोयीची भूमिका ठरली. त्यानंतर अतिक्रमण उपआयुक्त रोहिदास बहिरम अचानक सुटीवर गेले आहेत. पोलिसांनी गाळे उभारण्यास परवानगी न देण्याची भूमिका जाहीर केली असली तरी त्यासंदर्भात कोणतीही कारवाई न करताच गाळेधारकांनी सोयीची भूमिका घेतली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरात शांतता क्षेत्र म्हणजेच सायलेन्स झोन असून, अशा ठिकाणी मुळातच गाळे उभारता येत नाही. त्यातच हे गाळे थेट रस्त्यावर दुतर्फा उभारले जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. साहजिक शांतता क्षेत्र आणि वाहतुकीस अडथळा हे दोन्ही विषय पोलीस यंत्रणेच्या अखत्यारीत आहेत. परंतु एरव्ही सर्वसामान्य नागरिकांची छळवणूक करणारी पोलीस यंत्रणा मख्खपणे हे बघत आहे आणि राजकीय संरक्षण असलेल्या विक्रेत्यांची पाठराखण करीत आहेत. पालिका स्वबळावर हे गाळे हटवू शकत नाही हे ज्ञात असल्यानेच पोलीस यंत्रणा सोयीची भूमिका घेत आहे. (प्रतिनिधी)