महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मतांवर कोणाचा डल्ला?

By admin | Published: February 12, 2017 12:28 AM2017-02-12T00:28:05+5:302017-02-12T00:30:21+5:30

सेना-भाजपाची नजर : मागील निवडणुकीत २८ टक्के मते

Who is scared of Maharashtra Navnirman Sena votes? | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मतांवर कोणाचा डल्ला?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मतांवर कोणाचा डल्ला?

Next

नाशिक : सन २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेचे इंजिन सुसाट धावले आणि चाळीस जागा पदरात पडण्याबरोबरच मतांच्या टक्केवारीतही अव्वल ठरले होते. मनसेच्या इंजिनला लागलेल्या चाळीस डब्यांपैकी ३० डबे पळवून नेणाऱ्या सेना-भाजपाची आता मनसेने मागील निवडणुकीत मिळविलेल्या तब्बल २८.२३ टक्क्यांवर नजर पडली असून, दोहोंसह अन्य पक्षांमधूनही कोण किती मनसेच्या मतांवर डल्ला मारतो, हे २३ फेबु्रवारीला समोर येणार आहे.
मागील महापालिका निवडणुकीत द्विसदस्यीय प्रभाग रचना होती. या निवडणुकीसाठी १० लाख ३ हजार मतदार होते. त्यातील ५ लाख ७२ हजार आठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एका मतदाराला दोन मते देण्याचा अधिकार असल्याने एकूण वैध मतांची संख्या ११ लाख ४४ हजार १६ इतकी होती. या वैध मतांमधून मनसे सर्वाधिक ३ लाख २३ हजार ४२ मते मिळून सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयाला आला होता. मनसेच्या एकूण मतदानाची टक्केवारी २८.२३ इतकी होती. त्याखालोखाल शिवसेनेला १७.७३ टक्के मते मिळाली होती. शिवसेनेपेक्षा एक जागा मिळूनही राष्ट्रवादीची मात्र मतांची टक्केवारी शिवसेनेपाठोपाठ १३.५१ टक्के इतकी राहिली. कॉँग्रेसने ११.९६ टक्के, भाजपाने ११.५० टक्के, माकपाने १.२० टक्के, भाकपाने ०.०१ टक्का, बसपाने ०.७९ टक्के, समाजवादी पक्षाने ०.०६ टक्के मते मिळविली होती. अपक्ष उमेदवारांनी १२.०४ टक्के मते घेतली होती. जनराज्य आणि रिपाइंमिळून मतांची टक्केवारी २.५५ टक्के राहिली. आता पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. सत्ताधारी मनसेची अवस्था शोचनीय बनली आहे. मनसेच्या ४० नगरसेवकांपैकी तब्बल ३० नगरसेवक सेना-भाजपात गेले.
मागील निवडणुकीत मनसेकडे झुकलेला सुमारे २८ टक्के मतदार आता नेमका कुणाकडे झुकतो, हे येत्या २३ फेबु्रवारीला मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. मनसेपासून दुरावलेला मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी प्रामुख्याने सेना-भाजपात स्पर्धा लागणार आहे. मनसेने यंदा १२२ पैकी १०३ उमेदवार दिले आहेत. त्यात मनसेच्या विद्ममान महापौरांसह आठ नगरसेवकांचा समावेश आहे. यंदा मनसेच्या पारड्यात किती मतदान पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Who is scared of Maharashtra Navnirman Sena votes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.