कोणाला होईल कोणाचा फायदा व तोटा हे तर औत्सुक्याचे ठरावेच, पण अपक्ष उमेदवारीची जोखीम त्यापेक्षा अधिक कोकाटे ‘अटळ’ राहिल्याने नाशकात आता खरी चुरस...

By किरण अग्रवाल | Published: April 14, 2019 01:14 AM2019-04-14T01:14:24+5:302019-04-14T01:36:10+5:30

कोणत्याही परिस्थितीत लढायचेच या तयारीने कामास लागलेल्या माणिकराव कोकाटे यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने ते भुजबळांना लाभदायी ठरतात की गोडसे यांना, याची चर्चा होणे स्वाभाविक आहे. परंतु तशी ती करताना आतापर्यंत विविध राजकीय घरोबे बदलून पुन्हा अपक्ष लढण्याची त्यांनी पत्करलेली जोखीम दुर्लक्षता येऊ नये.

Who will benefit someone and the loss is a reality, but the risk of independent candidacy is more than that of the 'kokate'. | कोणाला होईल कोणाचा फायदा व तोटा हे तर औत्सुक्याचे ठरावेच, पण अपक्ष उमेदवारीची जोखीम त्यापेक्षा अधिक कोकाटे ‘अटळ’ राहिल्याने नाशकात आता खरी चुरस...

कोणाला होईल कोणाचा फायदा व तोटा हे तर औत्सुक्याचे ठरावेच, पण अपक्ष उमेदवारीची जोखीम त्यापेक्षा अधिक कोकाटे ‘अटळ’ राहिल्याने नाशकात आता खरी चुरस...

Next
ठळक मुद्देप्रामुख्याने तिरंगी लढती होऊ घातल्या आहेत.अपक्ष लढणे सोपे नसते हेच स्पष्ट विधानसभेच्या वेळी काय समीकरणे घडून येतील हे आज सांगता येऊ नये.

सारांश
मतविभाजनासाठी नव्हे, तर जिंकण्यासाठीच आपली उमेदवारी असल्याची गर्जना करीत माणिकराव कोकाटे यांनी आपली उमेदवारी अखेर कायम राखल्याने नाशिकच्या लढतीतील चुरस वाढून जाणे स्वाभाविक ठरले आहे. युती व आघाडी या दोघांच्या उमेदवारांना आपापल्या गणितांची फेरमांडणी करून बघणे त्यामुळेच गरजेचे बनले आहे.
नाशिक व दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील निवडणुकीचे चित्र अर्ज माघारीनंतर स्पष्ट झाले आहे. नाशकात १८, तर दिंडोरीत आठ उमेदवार रिंगणात असले तरी या दोन्ही ठिकाणी प्रामुख्याने तिरंगी लढती होऊ घातल्या आहेत. यात दिंडोरीमध्ये धनराज महाले, डॉ. भारती पवार व जे. पी. गावित हे तिघे पक्षीय उमेदवार आहेत, तर नाशकात हेमंत गोडसे व समीर भुजबळ या दोघा प्रमुख पक्षियात कोकाटे या अपक्ष उमेदवाराने रंग भरून दिले आहेत. जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकांचा पूर्वेतिहास पाहता पूर्वीच्या मालेगाव व नंतरच्या दिंडोरी आणि नाशिक या तीनही मतदारसंघांत आतापर्यंत तब्बल ११५ अपक्ष लढले असले तरी एकालाही विजय मिळविता आलेला नाही. कॉँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवून १९८० मध्ये विजयी झालेले डॉ. प्रतापराव वाघ तद्नंतरच्या ८४च्या निवडणुकीत अपक्ष लढले असता अवघ्या २.१३ टक्के मतांचे धनी ठरले होते. यावरून अपक्ष लढणे सोपे नसते हेच स्पष्ट व्हावे. पण तरी कोकाटे यांच्यासारखी राजकारणातील अनुभवी व्यक्ती अपक्ष लढण्याचे धाडस दाखविते तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.
महत्त्वाचे म्हणजे, नाशकात तसे एकूण तब्बल दहा अपक्ष रिंगणात असले तरी कोकाटे यांची राजकीय मातब्बरी पाहता ते प्रारंभापासूनच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. शिवाय चर्चेला अधिक हवा देताना कोकाटे यांनी घेतलेल्या जाहीरसभेत त्यांच्यामुळे होणाऱ्या मतविभागणीच्या मुद्द्याला खोडून काढताना जी राजकीय फटकेबाजी केली त्यामुळे ते अधिक दखलपात्र ठरून गेले. मतविभागणीसाठी भुजबळांनी आपल्याला उभे केले असल्याचे बोलले जात असले तरी ते खरे नाही, उलट भुजबळांनी ‘मातोश्री’शी संधान बांधून मुद्दाम सोयीचा उमेदवार म्हणून गोडसे यांना शिवसेनेची उमेदवारी द्यायला लावली असे कोकाटे यांनी सांगितले. त्यामुळे मतदारांच्या संभ्रमात भरच पडून गेली आहे, पण कोकाटे हे जर गोडसे यांना भुजबळ यांच्या सोयीचे समजत असतील तर मग गैरसोयीचा कोण, असा प्रश्न आपसूकच उपस्थित व्हावा.
निवडणुकीच्या राजकारणात जात फॅक्टर आणणे योग्य नसले तरी तो अलीकडे महत्त्वाचा मुद्दा ठरू लागला आहे. त्याअनुषंगाने ढोबळपणे विचार करता गोडसे व कोकाटे यांच्यात सजातीय मतांचे विभाजन होण्याचा कयास आहे. गेल्यावेळी गोडसे तशी कोरी पाटी घेऊन रिंगणात होते तरी मोदी लाटेमुळे छगन भुजबळ यांना मोठ्या मताधिक्याने पराभूत करून ते जाएंट किलर ठरले होते. यंदा गेल्या पंचवार्षिक काळातील प्रगतीपुस्तक त्यांच्या हाती आहे. त्यामुळे मोदी लाट ओसरल्याचा काही प्रमाणात परिणाम होणार असला तरी, गोडसे यांनी करून दाखविलेल्या कामांमुळे त्यांच्या मतांचे गणित सरासरीत राहण्याचे अंदाज अगदीच नाकारता येऊ नयेत. अशात भुजबळांसाठी गोडसे यांच्याऐवजी कोकाटे यांचीच उमेदवारी सोयीची ठरणे शक्य म्हणता यावे. भुजबळांची गैरसोय होणारच असेल तर ती वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने कदाचित होऊ शकेल. परंतु, ते गाठू शकणारी मतसंख्या निर्णयाचे पारडे फिरवू शकेल का हा पुन्हा प्रश्नच आहे.
दुसरे म्हणजे, कोकाटे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत सिन्नरमध्ये भाजपाकडून उमेदवारी करून पराभव पत्करला आहे. कॉँग्रेस, शिवसेना व भाजपा असे सारे प्रमुख पक्ष फिरून आता पुन्हा बंडखोरी करून ते लोकसभा निवडणूक लढवीत आहेत व तीदेखील अपक्ष. तेव्हा ते भुजबळांना लाभदायी ठरतील की गोडसेंना? या चर्चेपेक्षाही त्यांनी स्वत: पत्करलेली जोखीम महत्त्वाची म्हणायला हवी. अर्थात, राजकीय पक्षही आता केवळ सक्षमतेच्या निकषावर उमेदवाºया वाटप करीत असल्याने पुन्हा पुढच्या विधानसभेच्या वेळी काय समीकरणे घडून येतील हे आज सांगता येऊ नये. परंतु आज लोकसभेसाठी मागे न हटता आपली उमेदवारी कायम राखून कोकाटे यांनी अधिकृत पक्षीय उमेदवारांना त्यांच्या गणितांची फेरमांडणी करण्यास भाग पाडले आहे, हे मात्र नक्की !

Web Title: Who will benefit someone and the loss is a reality, but the risk of independent candidacy is more than that of the 'kokate'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.