नाशिक आणि दिंडोरीची जागा कोण लढवणार?; जाहीर सभेपूर्वी पवारांनी केलं स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 04:04 PM2024-03-13T16:04:16+5:302024-03-13T16:04:46+5:30
शरद पवार यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना जिल्ह्यातील नाशिक लोकसभा आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाबाबत भाष्य केलं आहे.
NCP Sharad Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यास काही दिवसांचाच अवधी बाकी असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याचं दिसत आहे. राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून आता मतदारसंघांमध्ये जात उमेदवारांची घोषणाही होऊ लागली आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मुंबई आणि सांगली लोकसभेसाठी उमेदवार घोषित केल्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना जिल्ह्यातील नाशिक लोकसभा आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाबाबत भाष्य केलं आहे.
महाविकास आघाडीत नाशिकची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणि दिंडोरीची जागा आम्हाला मिळेल, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. "लोकांचा कल आघाडीला अनुकूल असा आहे, शेतकऱ्यांची सत्तेतील लोकांवर नाराजी आहे. धुळे, नाशिक, सातारा जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी नाराज आहेत. याची किंमत सत्ताधाऱ्यांना मोजावी लागेल," असा हल्लाबोलही यावेळी शरद पवारांनी केला आहे.
दरम्यान, कालच शिवसेनेचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून खासदार हेमंत गोडसे हेच पुन्हा महायुतीचे उमेदवार असतील, असं जाहीर केलं आहे. त्यानंतर महाविकास आघाडीत ही जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जाणार असल्याचं आज पवार यांनी सांगितल्याने नाशिकमध्ये हेमंत गोडसे विरुद्ध विजय करंजकर असा सामना बघायला मिळण्याची शक्यता आहे
दिंडोरीत कोण येणार आमने-सामने?
मागील लोकसभा निवडणुकीत दिंडोरीतून भाजपच्या तिकिटावर भारती पवार यांनी विजय मिळवला होता. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी जि. प. सदस्य भास्कर भगरे यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचं दिसत आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या मतदारसंघातील निफाड तालुक्यात आज शरद पवार सभा घेणार आहेत. या सभेत शरद पवार आपल्या उमेदवाराबाबत काही घोषणा करतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.