छगन भुजबळांविरोधात येवल्यातून कोण लढणार?; मविआतील 'या' नेत्यांची नावे चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 02:51 PM2024-10-26T14:51:30+5:302024-10-26T14:53:46+5:30
महाविकास आघाडीच्या काही याद्या जाहीर होऊनही येवल्यामधून अद्याप उमेदवार जाहीर न झाल्याने याबाबतची उत्सुकता वाढीला लागली आहे.
NCP Chhagan Bhujbal ( Marathi News ) : राज्यातील हेवीवेट नेते असलेले मंत्री छगन भुजबळ हे येवला मतदारसंघामधून पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मात्र त्यांना टक्कर देण्यासाठी कोण हे अद्याप निश्चित ठरत नसल्यामुळे तेथील विरोधकांच्या उमेदवारीचा तिढा कायम आहे. कायमच चर्चेमध्ये राहणारे अशी ओळख असलेले छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुभंगल्यावर अजित पवार यांच्याबरोबर गेले आणि त्यांनी थोरल्या साहेबांची नाराजी ओढवून घेतली. त्यामुळे शरद पवार यांनी फुटीनंतरची पहिली सभा येवल्यात घेतली. यामुळे ते तुल्यबळ उमेदवार देतील, अशी अपेक्षा होती. मात्र काही याद्या जाहीर होऊनही येवल्यामधून अद्याप उमेदवार जाहीर न झाल्याने याबाबतची उत्सुकता वाढीला लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे माणिकराव शिंदे यांची उमेदवारीसाठी दावेदारी असून, त्यांनी काही महिन्यांपासून मतदारसंघात फिरणेही सुरू केले आहे. त्याचप्रमाणे भुजबळ यांना विरोध करण्यामध्ये माजी आमदार नरेंद्र दराडे व आमदार किशोर दराडे हे बंधंही येथे आघाडीवर आहेत. त्यांच्यापैकी कोणी निवडणूक लढविणार का? याचीही उत्सुकता आहे.
नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे हे ठाकरे गटाचे युवक जिल्हाप्रमुख असून, मध्यंतरी त्यांनी मुंबईमध्ये शरद पवार यांची भेट घेतल्याने ते तुतारी हाती घेणार अशी चर्चा सुरू होती; मात्र अद्याप त्याबाबत काहीही हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे भुजबळ यांना बाहूबळ कोण दाखवणार हा सध्या चर्चेचा मुद्दा बनला आहे.
जरांगेंची भूमिका काय राहणार?
मराठा समाजाला ओबीसी कोट्यामधून आरक्षण देण्याला भुजबळ यांनी जोरदार विरोध केल्याने त्यांचे जरांगे यांच्याबरोबर जोरदार शाब्दिक युद्ध रंगले. छगन भुजबळ यांना विरोध करीत त्यांच्याविरुद्ध जोरदार प्रहार केले होते. मध्यंतरी त्यांनी येवल्याचा दौराही केला, मात्र त्यामध्ये त्यांनी भुजबळांविरोधात एक शब्दही काढला नाही. आताही ते काय भूमिका घेणार हे अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे जरांगे यांनी दिलेल्या एखाद्या उमेदवाराला मविआ पाठिंबा देणार का? याबाबतची चर्चा सुरू झाली आहे.
पन्नास हजारांहून अधिक मताधिक्य
- छगन भुजबळ यांनी सन २००४ मध्ये प्रथम येवला मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि शिवसेनेचे कल्याणराव पाटील यांना पराभूत करून ते निवडून आले. तेव्हापासून आतापर्यंत भुजबळ यांना प्रत्येकवेळा लाखाच्या वर मते मिळाली असून, त्यांचे मताधिक्य सुमारे ५० हजारांचे राहिले आहे. त्यानंतर त्यांनी माणिकराव शिंदे यांचा एकदा, तर संभाजीराव पवार यांचा दोनदा पराभव केला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी त्यांच्या विरोधात शिवसेनेचाच उमेदवार होता.