बोलठाणला कुणाला पावणार शनैश्वर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 08:46 PM2021-01-20T20:46:33+5:302021-01-21T01:28:26+5:30

संजीव धामणे नांदगाव : तालुक्यातील घाटमाथ्यावर असलेल्या आणि राजकीयदृष्ट्या सजग असलेल्या बोलठाण ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनाप्रणीत शनैश्वर पॅनलने ८ जागा जिंकून बहुमत प्राप्त केले आहे. मागील पंचवार्षिक काळात या ठिकाणी इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी सरपंचपदाचे आरक्षण होते. यंदा गावातील लोकसंख्येचा विचार करता सर्वसाधारण अथवा इतर मागासवर्ग महिला आरक्षण निघण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

Who will get Bolthan Shanaishwar? | बोलठाणला कुणाला पावणार शनैश्वर?

बोलठाणला कुणाला पावणार शनैश्वर?

Next
ठळक मुद्देशिवसेनेचे वर्चस्व : सर्वसाधारण, ओबीसी महिला आरक्षणाची शक्यता

बोलठाण ग्रामपंचायतीमध्ये मागील पंचवार्षिक काळात मिलीजुली कारभार होता. यंदा मात्र शिवसेनाप्रणीत शनैश्वर पॅनलला १३ पैकी ८ जागांवर विजय मिळाल्याने बहुमत प्राप्त झाले आहे. त्यामुळे मागील वर्षाचा सत्तेचा फॉर्म्यूला यावेळी चालणार नाही. काँग्रेसप्रणीत परिवर्तन पॅनलला ५ जागांवर विजय मिळाला आहे. शनैश्वर पॅनलचे अंजुम रफिक पठाण, उज्ज्वला राजेश नवले, मंगला शिवप्रसाद कायस्थ, विष्णू आनंदराव बारवकर, अनिल साहेबराव सोनवणे, वाल्मीक संभाजी गायकवाड, कविता मनोहर रिंढे व अनिता दिलीप आसावा हे निवडून आले आहेत तर परिवर्तन पॅनलचे नितीन ताराचंद कायस्थ, सुभाष कन्हय्यालाल नहार, गणेश अशोक व्यवहारे, कांताबाई अशोक काळे व सुनीता भगवंत बनकर हे उमेदवार निवडून आले आहेत. मागील पंचवार्षिक काळात सरपंचपद ओबीसी पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित होते. गेली पाच वर्षे ज्ञानेश्वर नवले यांनी सरपंचपद भूषविले. आता लोकसंख्येचा विचार करता सर्वसाधारण अथवा ओबीसी महिला यासाठी सरपंचपदाचे आरक्षण निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी कुणाची वर्णी लागते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कोण आहेत स्पर्धेत?
यंदा सरपंचपद सर्वसाधारण झाल्यास अंजुम रफिक पठाण व उज्ज्वला राजेश नवले तसेच ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाल्यास कविता मनोहर रिंढे व मंगलाबाई कायस्थ हे स्पर्धेत आहेत. एस.टी.साठी आरक्षण निघाल्यास अनिल सोनवणे तर एससीसाठी वाल्मीक गायकवाड यांची नावे चर्चेत आहेत.
जातेगावी आघाडीचे ११ उमेदवार विजयी
बोलठाणलगत असलेल्या जातेगाव ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीचे ११ उमेदवार विजयी झाले असून, राष्ट्रवादीचे ४ उमेदवार निवडून आले आहेत. या ठिकाणी यापूर्वी सरपंचपद एससी राखीव होते, तेव्हा जयश्री लाठे या सरपंच होत्या. यावेळी सरपंचपदासाठी ओपन/ओबीसी आरक्षण निघाल्यास रामदास पाटील, संदीप पवार, संतोष गायकवाड तांड्यावरची महिला वैशाली चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. जुळवाजुळव झाली तर धनश्री पवार या देखील पदावर दावा ठोकून आहेत. एससीसाठी बाळू लाठे, एसटीसाठी शांताबाई पवार हे उमेदवार ठरतील.

Web Title: Who will get Bolthan Shanaishwar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.