सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती देणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 02:09 AM2019-03-18T02:09:15+5:302019-03-18T02:10:26+5:30
‘मोदी हटाव’साठी देशातील २२ पक्षांनी एकत्र येऊन ‘हम साथ साथ हैं’चा नारा दिला व आता ते एकमेकांना ‘हम आपके हैं कौन?’ अशी विचारणा करीत आहेत. त्यामुळे निवडणुकीनंतर सत्तेची सूत्रे कोणाच्या हातात देणार हे विरोधकांनीे अगोदर जाहीर करावे, असे खुले आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
नाशिक : ‘मोदी हटाव’साठी देशातील २२ पक्षांनी एकत्र येऊन ‘हम साथ साथ हैं’चा नारा दिला व आता ते एकमेकांना ‘हम आपके हैं कौन?’ अशी विचारणा करीत आहेत. त्यामुळे निवडणुकीनंतर सत्तेची सूत्रे कोणाच्या हातात देणार हे विरोधकांनीे अगोदर जाहीर करावे, असे खुले आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
भाजपा-शिवसेनेच्या उत्तर महाराष्टÑातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या मनोमीलनासाठी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सेनेचे प्रवक्ते संजय राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.
फडणवीस पुढे म्हणाले, विरोधकांमध्ये आत्तापासूनच एकमेकांना पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले असून, सेना-भाजपाची युती झाल्यानंतर राज्यात विरोधकांचे चेहरे उतरले, काहींनी निवडणुकीतून थेट माघार घेतली तर काही जागांवर अद्याप त्यांना उमेदवारच मिळालेले नाहीत. हिंदुत्वाच्या धाग्याने युतीला बांधून ठेवले आहे. ३० वर्षांपासूनची ही युती ‘फेव्हिकॉल’च्या जोडसारखी कायम राहील.
कॉँग्रेसवर टीका करताना फडणवीस म्हणाले, कॉँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला होता, प्रत्यक्षात जनतेची नाही तर त्यांनी त्यांची स्वत:ची गरिबी हटवून घेतली. त्यामुळे येत्या निवडणुकीत राष्टÑवादी नेतृत्वाच्या हातीच सत्ता द्या, असे आवाहनही शेवटी फडणवीस यांनी केले.
प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले तर प्रास्ताविक पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. महाजन म्हणाले, गेली चार वर्षे आम्ही वेगवेगळे लढलो; परंतु आता एकत्र आलो आहोत. व्यासपीठावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, गृहराज्यमंत्री राम शिंदे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, महापौर रंजना भानसी, माजी मंत्री बबन घोलप उपस्थित होते. मेळाव्यास उत्तर महाराष्टÑातील युतीचे सर्व खासदार, आमदार व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
देव, देश आणि धर्मासाठीच युती : उद्धव ठाकरे
शिवसेना आणि भाजपाची युती देव, देश आणि धर्मासाठीच असल्याने वेगळ्या विचाराच्या हाती देश सोपविणे परवडणारे नसल्याचे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. युतीच्या उत्तर महाराष्टÑ कार्यकर्त्यांच्या महामेळाव्यात ठाकरे यांनी आता आमच्यात कोणताही वाद नसल्याचे सांगितले. तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफी अजूनही पोहचली नसेल तर केंद्रे उघडून ती पोहचवा, पीक विम्याचे पैसे मिळाले नसतील तर ते पोहचवावे, मराठवाड्याचा पाणीप्रश्न हाही मुद्दा आहेच. अनेक प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्याने आता वादाचे मुद्देच संपल्याचे आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचा पुनरूच्चार ठाकरे यांनी केला. आपली युती झाली असली तरी शत्रूला कमी लेखू नका. राजकारणातील ते मातब्बर असल्याने गाफील राहू नका, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.
श्रोत्यांचे हसणे नेत्यांच्या जिव्हारी !
राज्यात कोणत्याही परिस्थितीत सेना-भाजपाची युती होणार नाही असे म्हणणारे सेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात झालेली तूतू-मै-मै सर्वांना माहिती आहे. मेळाव्यात हे दोन्ही नेते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते. संजय राऊत हे बोलण्यासाठी उभे राहताच, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘महाराष्टÑाचे लाडके मुख्यमंत्री’ असा उल्लेख करताच सभागृहात जोरदार हास्यस्फोट झाला. राऊत यांच्यानंतर रावसाहेब दानवे हे बोलण्यास उभे राहताच, पुन्हा एकदा सभागृहात सर्वांनाच हसू फुटले. त्यावर दानवे म्हणाले, ‘राऊत यांच्या बोलण्याच्या वेळी फुटलेल्या हास्याचा सूर व माझ्या वेळी उठलेले हास्य या दोन्हीचा सूर वेगवेगळा होता, हे माझ्या लक्षात आले आहे. आता यापुढे सर्वांचा आवाज एकच निघावा यासाठीच प्रयत्न करावा लागेल’. भाषणाच्या प्रारंभीच श्रोते हसल्याची बाब मात्र दोघांच्या जिव्हारी लागल्याचे दिसले.
मनोमीलनातही खडसे भाषणापासून दूर!
भाजपा-शिवसेनेच्या उत्तर महाराष्टÑातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या मनोमीलनासाठी झालेल्या मेळाव्यामध्ये फर्डे वक्ते एकनाथ खडसे यांना भाषणापासून दूर ठेवले गेल्याचे दिसून आले.
गेल्या काही दिवसांपासून मुख्य प्रवाहापासून काहीसे वेगळे पडलेले भारतीय जनता पक्षाचे उत्तर महाराष्टÑातील प्रमुख नेते, एकनाथ खडसे यांना या मेळाव्यात पक्षाने व्यासपीठावर स्थान दिले; परंतु त्यांना भाषणाची संधी मात्र मिळाली नाही. चिमटे काढत बोलण्याच्या शैली, आक्रमकपणाबद्दल खडसे प्रसिद्ध असून, भाजपात त्यांना मानणारा वर्ग आहे. असे असतानाही खडसे यांना ‘मन मोकळे’ करण्याची संधी देण्यात आली नाही. मंत्रिपद काढून घेतल्यापासून खडसे नाराज आहेत. अधूनमधून ते स्वपक्षाला अडचणीत आणणारी विधानेही करतात. त्यांना पक्षाने सबुरीचा सल्लाही दिला; परंतु त्यांची नाराजी कमी झाली नाही. त्यामुळेच कदाचित आयोजकांनी खडसे यांना बोलण्याची संधी दिली नसावी, अशी चर्चा रंगली
होती.